Advertisement

नुकसानग्रस्तांना आणखी मोठं पॅकेज? शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ सूचना

शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड आणि कोकणातील जनतेला कशा प्रकारे मदत करता येऊ शकते यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या.

नुकसानग्रस्तांना आणखी मोठं पॅकेज? शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ सूचना
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (sharad pawar meet cm uddhav thackeray and ajit pawar after cyclone nisarga affected konkan and raigad visit) यांच्यासोबत दादर येथील दि. बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात बैठक घेतली. या बैठकीत पवार यांनी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड आणि कोकणातील जनतेला कशा प्रकारे मदत करता येऊ शकते यावर काही सूचना केल्या. 

पंचनाम्यांची आकडेवारी

यासंदर्भात माहिती देताना शरद पवार म्हणाले की, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणातून मिळालेल्या माहितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आलं. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत व पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्रात पुन्हा कठोर लाॅकडाऊन? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा..

फळबागांसाठी स्पेशल पॅकेज

या भागातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. जेणेकरून या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची वेळ आल्यास ते देखील करावं लागेल. चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करून, फळबाग लागवड योजनेशी त्याची सांगड घातल्यास हा मार्ग अधिक उपयुक्त ठरू शकेल अशी सूचना बैठकीदरम्यान केल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

पर्यटनाला चालना

या चक्रीवादळात घरे, बागा यांचं मोठं नुकसान झालं आहे. भिंती-छप्परे आणि झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. हे कचऱ्याचे ढिगारे साफ करून घरे, बागा व दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठे काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करता येईल. निसर्ग चक्रीवादळाचा पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज वाटत असल्याचं शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

बहुतांश भागातील बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी तसेच नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरू होणं गरजेचं आहे. तसंच नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का हे पाहणं जरूरी आहे.

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ: राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा