Advertisement

नाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न, नीलेश राणेंचा गंभीर आरोप

नाणारमधील जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नातेवाईकाचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते नीलेश राणे यांनी केला आहे.

नाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न, नीलेश राणेंचा गंभीर आरोप
SHARES

नाणार रिफायनरीचा विषय आमच्यासाठी संपला असं शिवसेना नेतृत्व आणि शिवसेना नेते म्हणत असले, तरी प्रत्यक्षात हा प्रकल्प पुन्हा आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एवढंच नाही, तर नाणारमधील जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नातेवाईकाचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते नीलेश राणे यांनी केला आहे. (bjp leader nilesh rane alleges shiv sena chief and cm uddhav thackeray over nanar refinery project)

नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाणार रिफायनरी प्रकल्पाविषयी अनेक दावे करत शिवसेनेवर गंभीर आरोपही केले. यावेळी ते म्हणाले की, नाणारचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार नेहमी बोलत असतात. परंतु नाणारची एक कमिटी हा प्रोजेक्ट पुन्हा आणू पाहत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये नव्हे, तर राजापूरमध्ये व्हावा यासाठी एका कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पडद्यामागून मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहेत. प्रकल्प रद्द झाल्याचं सांगत असाल, तर चर्चा कशासाठी होत आहेत ? असा प्रश्न नीलेश राणे यांनी केला.

हेही वाचा - नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द

नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाच्या कंपनीने १४०० एकर जमीन घेतली आहे. दीपक वायंगणकर या व्यक्तीमार्फत ही जागा घेण्यात आली आहे. या सुगी डेव्हलपर्सच्या संचालकांमधील एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. त्यांचे एकमेकांसोबतचे अनेक फोटो आहेत, हे संबंध ते नाकारू शकत नाही, असंही नीलेश राणे म्हणाले.

नाणारमधील बहुतांश जमीख खरेदीचे व्यवहार परप्रांतीयांसोबत करण्यात आले आहेत. यामध्ये १० टक्के स्थानिकसुद्धा नाहीत. रुचा डेव्हलपर्स नावाच्या कंपनीने नाणारजवळ ९०० एकरच्या जवळपास गुंतवणूक केली आहे. नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेची आंदोलने सुरू असतानाच दुसरीकडे हे व्यवहार सुरू होते. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही याठिकाणी जमीन घोटाळे केले आहेत, असा आरोप नीलेश राणे यांनी केला.

युती सरकारच्या काळात सत्तेत असून देखील शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. नाणार प्रकल्प शिवसेनेने प्रतिष्ठेचा करत भाजपला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा