Advertisement

“आयसीयूत उंदीर घुसणं ही महापालिकेसाठी शरमेची गोष्ट”

कोविडच्या काळात स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी ही शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे.

“आयसीयूत उंदीर घुसणं ही महापालिकेसाठी शरमेची गोष्ट”
SHARES

महापालिकेच्या एखाद्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उंदीर घुसून रुग्णाचे डोळे कुरतडने ही अतिशय गंभीर बाब तर आहेच. परंतु कोविडच्या काळात स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट असल्याची टीका भाजप (bjp) आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

घाटकोपर येथील मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात, उंदराने एका रुग्णाचे डोळे कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रविण दरेकर यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन संबंधित रुग्णाची विचारपूस केली. यानंतर दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी प्रविण दरेकर यांनी मुंबई महापालिकेवर टीका करताना म्हटलं की, माझ्या भेटीनंतर रुग्णालयातील डाॅक्टरांनी महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेमुळे १०० टक्के मुंबईकरांना किंबहुना महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लागेल. अशा प्रकारची ही भयानक घटना आहे. 

हेही वाचा- महापालिकेची तिजोरी कोण कुरतडतंय?, आशिष शेलारांचा संतप्त सवाल

अशा प्रकारची घटना एक ते दीड वर्षांपूर्वी सायन रुग्णालयात देखील झाली होती. तर मग जगात सर्वोत्तम महापालिका, कोविडच्या काळात पाठ थोपटून घेणारी महापालिका असताना, एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूत जर उंदीर रुग्णाचे डोळे कुरतडत असेल, तर यापेक्षा गंभीर बाब असूच शकत नाही. मग काम चालू आहे म्हणून उंदीर आला असेल किंवा कुठं लिकेज असेल म्हणून आला असेल, तर हा तुमचा प्रश्न आहे.

महापालिकेच्या (bmc) नियमानुसार आयसीयूत योग्य सॅनिटायझेशन होण्याची गरज आहे. ते जर फूलप्रूफ असतं, तर उंदीर येऊ शकला नसता. याचा अर्थ सॅनिटायझेशन करणारी यंत्रणा कमी पडली का? संबंधित सॅनिटायझेशनचे अधिकारी कुठं आहेत? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.

केवळ चौकशी झाली, अहवाल आला आणि तो बासनात गुंडाळून ठेवला, असं होता कामा नये. कारण या रुग्णाच्या नातेवाईकांना असंच वाटतं की जे आमच्यासोबत झालं ते इतर कुणासोबतही होऊ नये. सायनमधील घटनेनंतरही तुम्ही सुधरलेला नाहीत. राजावाडीत तर कुणाचंच लक्ष नसल्याचं म्हटलं जात आहे. मी माहिती घेत असताना मला कळलं की इथले डाॅक्टर्सच आऊटसोर्सिंग केलेले आहेत. इथलेच नाही, तर पूर्ण मुंबईतील डाॅक्टर आऊटसोर्सिंग केलेले आहेत. आयसीयूतील डाॅक्टरच जर बाहेरचे असतील, तर रुग्णालय आणि रुग्णांप्रती त्यांना आत्मियता कशी वाटणार? असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी केला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा