Advertisement

सरकारच्या ढिसाळपणाचा मुंबईकरांना फटका- प्रविण दरेकर

सरकारच्या नियोजनशून्य ढिसाळपणाचा फटका कोकणवासीय व मुंबईकरांना बसला आहे, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

सरकारच्या ढिसाळपणाचा मुंबईकरांना फटका- प्रविण दरेकर
SHARES

कोकणातील अतिवृष्टीच्या धोक्याची कल्पना मी यापूर्वीच सरकाराला दिली होती. पण याविषयी काहीच उपोययोजना झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या नियोजनशून्य ढिसाळपणाचा फटका कोकणवासीय व मुंबईकरांना बसला आहे, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, वीस दिवसांपूर्वी मी सांगितलं होतं की मुसळधार पावसामुळं मुंबईतील जनजीवन ज्या तऱ्हेने उद्ध्वस्त झालं आहे. त्याच प्रकारे कोकणही डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला आहे, समुद्रकिनारी आहे, नद्या मोठमोठ्या आहेत, तेव्हा काळजी घ्या. परंतु सरकारने कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही, त्यामुळे अख्खं कोकण पाण्याखाली गेलं आहे. पूर्ण बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. दुर्दैवाचं म्हणजे त्यांना निवाऱ्याची व्यवस्था नाहीय. 

हेच जर पहिलं केलं असंत, निवाऱ्याची व्यवस्था केली असती, तर काम हलकं झालं असतं. एनडीआरएफच्या टीम अजून त्या ठिकाणी पुरेशा उपलब्ध झालेल्या नाहीत. म्हणून यासाठी जे पूर्वनियोजन करण्याची आवश्यकता होती, ते झालेलं नसल्यानेच ही दुरावस्था आहे. लोकांचे आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात, हा माझा सरकारला प्रश्न आहे. 

हेही वाचा- परमबीर सिंह यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

चेंबूर, विक्रोळी, भांडुप इथं दुर्घटना घडल्या. त्या थांबत नाही, तो ठाण्याला दुर्घटना घडली. ही मृत्यूची श्रृंखला तुम्ही राज्यभर पसरवणार आहात काय? मायबाप सरकार म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही का? सरकारने आतातरी या गोष्टी गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, असं आवाहन प्रविण दरेकर यांनी केलं.

दरम्यान, गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंता वाढली आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील ३ दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा इशारा दिला आहे. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत येथील पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसंच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा