Advertisement

राज्यपालांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचं कारण काय?, दरेकरांचा नवाब मलिकांना सवाल

राज्यपालांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या!

राज्यपालांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचं कारण काय?, दरेकरांचा नवाब मलिकांना सवाल
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कोरोनासंदर्भातील आढावा दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचं काहीच कारण नसल्याचं भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रविण दरेकर नवाब मलिकांना टोला लगावताना म्हणतात, महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही! नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या! नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील.

हेही वाचा- “राज्यपाल असल्याचा त्यांना विसर पडलाय का”, नवाब मलिकांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं

राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसीय दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेणार आहेत. या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारने तीव्र नापसंती दर्शवत विरोध केला आहे.

एवढंच नाही, तर मंत्रिमंडळ बैठकीत या दौऱ्यावर चर्चा देखील करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारच्या सचिवांना राजभवन इथं जाऊन राजभवन सचिवांना सरकारची नाराजी कळवण्यास सांगण्यात आलं. 

एवढंच नाही, तर राज्यपाल राज्यात दुसरं सत्ताकेंद्र असल्यासारखं वागत आहेत. भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आता वाटत असेल की ते मुख्यमंत्री आहेत, तर तसं नाही. त्यांना कळलं पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात, ते राज्यपाल आहेत याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केली होती. 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा