Advertisement

“राज्यपाल असल्याचा त्यांना विसर पडलाय का”, नवाब मलिकांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आता वाटत असेल की ते मुख्यमंत्री आहेत, तसं नाही. त्यांना कळलं पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही.

“राज्यपाल असल्याचा त्यांना विसर पडलाय का”, नवाब मलिकांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं
SHARES

महाराष्ट्राचे (maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या राज्यात काही ठिकाणी जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ही बाब सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलीच खटकली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील हा विषय चर्चेला आल्याने बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांवर यावरून जोरदार टीका केली. 

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले, राज्यपालांच्या दौऱ्यासंबंधित विषय आज कॅबिनेटमध्ये चर्चेला आल्यानंतर कॅबिनेटने आपली नापंसती व्यक्त केली. या दौऱ्याला विरोध देखील दर्शवला आहे. शिवाय राज्यपालांच्या सचिवांना याबाबत अवगत करावं, असं मुख्य सचिवांना सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव हे राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांची भेट घेत आहेत. 

राज्य सरकारची परवानगी न घेताच राज्यपाल कोरोना काळातही ठिकठिकाणी जाऊन आढावा घेत होते. याबाबत केंद्रात तक्रार झाल्यानंतर ते थांबले आणि पुन्हा या पद्धतीने त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हे योग्य नाही. राज्य सरकार यावर नाराजी व्यक्त करत असून मंत्रिमंडळाने या भूमिकेचा विरोध केलेला आहे, असं नवाब मलिक (nawab malik) म्हणाले.

हेही वाचा- रेस्टाॅरंट्सची वेळ वाढवा, लसीचे दोन्ही लस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्या- काँग्रेस

हे अधिकार राज्य सरकारचे असताना तुम्ही दुसरं सत्ताकेंद्र असल्यासारखं वागत आहात हे योग्य नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आता वाटत असेल की ते मुख्यमंत्री आहेत, तसं नाही. त्यांना कळलं पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात, ते राज्यपाल आहेत याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

त्यांना विद्यापीठांमध्ये जायचं असल्यास ते जाऊ शकतात. कारण, ते नांदेड विद्यापीठाचे कुलपती आहेत. परभणीच्या कृषी विद्यापीठाचा जो काही आढावा घ्यायचा आहे तो ते घेऊ शकतात. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे माहिती देण्यात आल्यानंतर ते दौरा थांबवतील,  असंही नवाब मलिक यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं. 

हेही वाचा- ...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा