Advertisement

आम्ही देव मानतो, उद्धव ठाकरेंचं माहीत नाही- चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे हे देखील पूर्वी देव मानायचे, आता ते मानतात की नाही माहीत नाही, अशा खोचक शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

आम्ही देव मानतो, उद्धव ठाकरेंचं माहीत नाही- चंद्रकांत पाटील
SHARES

आम्ही देव मानतो. उद्धव ठाकरे हे देखील पूर्वी देव मानायचे, आता ते मानतात की नाही माहीत नाही, अशा खोचक शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अद्याप मंदिरं व इतर धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी देत नसल्याने भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये मंदिर उघडण्यासाठी आंदोलनं केली. मात्र ठाकरे सरकारने भाजपच्या आंदोलनाला दाद न देता ही आंदोलनं मोडीत काढली. तरीही भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपच्या आंदोलनाआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देत मंदिरं खुली करण्याबाबत विचारणा केली होती. 

हेही वाचा - जनतेच्या श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं सरकारचं प्रथम कर्तव्य; राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं चोख उत्तर

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना सणसणीत उत्तर दिलं होतं. महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसतखेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

Have you suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना विचारला होता.त्यामुळे भाजप नेत्यांना चांगलीच मिरची झोंबली होती.

या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही देव मानतो. उद्धव ठाकरे हे देखील पूर्वी देव मानायचे, आता ते मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी मानता तर हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता. आम्ही केवळ मंदिर उघडा म्हणत नाही, सर्व धार्मिक स्थळे उघडा ही आमची मागणी आहे. पण खासदार संजय राऊत हे फार विद्वान आहेत, सर्वधर्मसमभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का,' असा प्रश्नही पाटील यांनी राऊतांना उद्देशून केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा