Advertisement

मोदींनी लाॅकडाऊन लावला तेव्हा… आशिष शेलारांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर

आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असं बरंच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच "हुषार" सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं सांगतात

मोदींनी लाॅकडाऊन लावला तेव्हा… आशिष शेलारांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) लाॅकडाऊन लावण्यावरून सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विरोधक भाजपमध्ये मोठी खडाजंगी सुरू आहे. सरकारला लाकडाऊन लावायचं असेल, तर जरूर लावावं, पण त्याआधी मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊन लावताना असं कुठलं पॅकेज दिलं होतं, असा प्रतिप्रश्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. त्याला भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.

आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला होता. पण त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला  (bjp) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. 

आज एक वर्षानंतर कोरोनाचे (coronavirus) उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असं बरंच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच "हुषार" सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोधही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा!

हेही वाचा- भाजप नेत्यांच्या मागण्या फक्त राजकारणासाठी, नवाब मलिकांचा टोला

तेव्हा मजूर स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली. धान्य, निवारा दिला! आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत. रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा पंतप्रधान मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत. मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?, असा प्रश्नही आशिष शेलार (ashish shelar) यांनी विचारला आहे.

दरम्यान, भाजपचे नेते सातत्याने लोकांच्या खात्यात पैसे टाका म्हणून सांगत आहेत. ते ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत, ते योग्य नाही. जेव्हा पहिल्यांदा लाॅकडाऊन लावण्यात येत होतं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही विचारात घेतलं नव्हतं. कुणाच्याही खात्यात पैसे टाकण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला नाही. त्यामुळे केवळ बाेलण्यापेक्षा राज्यातील जनतेचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचं असेल तो निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी केली होती.

(bjp mla ashish shelar criticized maha vikas aghadi government over lockdown in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा