Advertisement

पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेजमध्ये मुंबईकर कुठं?, भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये मुंबईकरांसाठी मदत का नाही? असा प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेजमध्ये मुंबईकर कुठं?, भाजपचा ठाकरे सरकारला सवाल
SHARES

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इतर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी ११,५०० कोटी रुपयांचं पॅकेज नुकतंच जाहीर केलं आहे. मात्र या पॅकेजमध्ये मुंबईकरांसाठी मदत का नाही? असा प्रश्न भाजपचे (bjp) आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात अधिक भाष्य करताना अतुल भातखळकर म्हणाले की, राज्य सरकारने ११५०० कोटी रुपयांचं पॅकेज पूरग्रस्तांसाठी जाहीर केलं आहे. पण यांत मुंबईकर कुठं आहेत? मुंबईकरांचा यात साधा उल्लेख देखील नाही. या पुरानंतर मुंबईकरांची अवस्था उजाडला पण सूर्य नाही, अशा प्रकारची आहे. मुंबईकरांची घरं पाण्यानं भरली, त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं, व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं, गाड्यांचं नुकसान झालं. पण मुंबईकरांच्या तोंडाला शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत.

हेही वाचा- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी ११, ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

ज्यांचं ज्यांचं वादळामध्ये आणि या पुरामध्ये नुकसान झालं अशा मुंबईकरांनासुद्धा भरघोस मिळाली पाहिजे. मच्छीमार, दुकानदार, व्यावसायिक, चाळकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. मदत न मिळाल्यास येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीकडून मोठं आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला. 

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत, पुनर्बांधणी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक आपत्तीग्रस्ताला आर्थिक, नैतिक, सामाजिक आधार देऊन पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली आहे.

राज्य सरकारने घोषित केलेल्या ११,५०० हजार कोटींपैकी १५०० कोटी नागरिकांच्या आर्थिक मदतीसाठी, ३००० कोटी पुनर्बांधणीसाठी, ७००० कोटी आपत्ती सौम्यीकरण कामासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या निधीचं तत्परतेनं वितरण केलं जाईल. आवश्यकतेनुसार भविष्यात अधिक निधी उपलब्ध करण्याची शासनाची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा- कोश्यारी घटनात्मक पदापेक्षा RSS साठीच काम करताना दिसतात- नितीन राऊत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा