Advertisement

Ganesh Festival: कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आधीच करा कोरोना टेस्ट- नितेश राणे

राज्य सरकारने राज्यातील विविध भागांतून गणेशोत्सव काळात काेकणात येणाऱ्या चाकरमान्यांची ते ज्या शहरांमध्ये आहेत, त्याच ठिकाणी मोफत कोरोना स्वॅब टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

Ganesh Festival: कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आधीच करा कोरोना टेस्ट- नितेश राणे
SHARES

राज्य सरकारने राज्यातील विविध भागांतून गणेशोत्सव काळात काेकणात येणाऱ्या चाकरमान्यांची ते ज्या शहरांमध्ये आहेत, त्याच ठिकाणी मोफत कोरोना स्वॅब टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्या आधारे आपल्या गावी येण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (bjp mla demands covid 19 test for konkan visitors for ganesh festival 2020) पत्र लिहून केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, कोकणात गणेशोत्सव सण हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने कोकणातील परंतु मुंबई-पुणे व अन्य शहरांच्या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे येतात. या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी सिंधुदुर्गात येणार आहेत. कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विविध मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये ई-पास काढणे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेणे व गावी आल्यावर क्वारंटाईन होणे इ. उपाययोजनांचा समावेश आहे. या सर्व गोष्टी चाकरमान्यांसाठी त्रासदायक आहेत.

हेही वाचा - Ganesh Festival 2020: चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाता येईल, पण…

गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी ज्या ठिकाणाहून निघणार त्याच ठिकाणी त्यांची मोफत कोरोना स्वॅब टेस्ट करून त्या आधारे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना प्रवास करण्यास तसंच जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवर स्वॅब टेस्ट रिपोर्ट दाखवून प्रवेश दिल्यास चाकरमान्यांच्या वेळेची बचत होणार आहे. कारण एकदा कोरोना टेस्ट केल्यानंतर ४८ तासांच्या आत चाकरमान्यांनी जिल्ह्यात प्रवेश करणं गरजेचं राहणार आहे. त्या कालावधीत सदर व्यक्ती सुखरूपपणे आपल्या गावच्या घरी पोहोचू शकतो. निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या व्यक्तींनाच जिल्ह्यात प्रवेश असल्याने क्वारंटाईनची गरज भासणार नाही. तसंच ई-पासचीही आवश्यकता नसल्याने शासनाच्या कर्मचारी वर्गावरील विशेषत: पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होऊन चाकरमान्यांचा आपल्या गावाकडील प्रवास सुखकर व विना त्रासाचा हाेईल.

तरी सरकारने राज्यातील विविध भागांतून गणेशोत्सव काळात काेकणात येणाऱ्या चाकरमान्यांची ते ज्या शहरांमध्ये आहेत, त्याच ठिकाणी मोफत कोरोना स्वॅब टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्या आधारे आपल्या गावी येण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. 

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी बस सोडा- राजू पाटील

संबंधित विषय
Advertisement