Advertisement

ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, नारायण राणेंचा सरकारवर निशाणा

ठाकरे सरकारने चेष्टा लावली असून याबाबत कोणीही बोलताना दिसत नाहीय, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, नारायण राणेंचा सरकारवर निशाणा
SHARES

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सिंधुदुर्गाला मुख्यमंत्र्यांनी अवघी २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांसाठीचे २०० कोटी परत घेतले आहेत. ठाकरे सरकारने चेष्टा लावली असून याबाबत कोणीही बोलताना दिसत नाहीय, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. राज्य सरकारने कितीही लपवाछपवीचा प्रयत्न केला तरी ही आकडेवारी लपणारी नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांना म्हणावा तसा उपचार देण्यात राज्य सरकार अयशस्वी ठरत असल्याचंही राणे म्हणाले.

मदत तुटपुंजी

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसंच सर्वसामान्यांना राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळ आलं तेव्हा मी कोकणातच होतो. किती नुकसान झालं आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. सध्या चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सरकारमधील नेते रायगड, कोकणचा दौरा करत आहेत. मदतीची घोषणा देखील करत आहेत. परंतु सरकारने जितकी मदत जाहीर केली आहे, ती मदत रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तुटपुंजी आहे. या मदतीने घर दुरुस्त होणार नाही की शेतीचीही नुकसानभरपाई होणार नाही.  

हेही वाचा- निकष बदलले, निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव मदत

जास्तीत जास्त मदत करा

सरकारची आर्थिक स्थिती कठीण आहे हे मी समजू शकतो. पण नैसर्गिक आपत्ती असल्याने तिजोरी कशीही असली तरी मदत केलीच पाहिजे. त्यामुळे सरकारने मदतीबाबत फेरविचार करावा आणि नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. 

२०० कोटी परत घेतले

सिंधुदुर्गाला सरकारने २५ कोटी रुपयांची मदत दिली आहे, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील २०० कोटी परत घेतले आहेत. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचं नुकसान झालं आहे. फक्त फेरफटका मारुन काही होत नाही. केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असा टोलाही नारायण राणे यांनी हाणला. 

दरम्यान, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केले आहेत. यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा वाढीव मदत मिळणार आहे. कोसळलेल्या पक्क्या घरांसाठी दीड लाख रुपये, तर बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा