Advertisement

निकष बदलले, निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव मदत

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा वाढीव मदत मिळणार आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केले आहेत.

निकष बदलले, निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव मदत
SHARES

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा वाढीव मदत मिळणार आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल (maharashtra government change rule of compensation for cyclone nisarga affected people) केले आहेत. त्यानुसार कोसळलेल्या पक्क्या घरांसाठी दीड लाख रुपये, तर बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळामुळे अडचणीत आलेल्या कोकणासह राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी राज्य शासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. तसंच कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे  उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधानमंडळाच्या परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 

वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. त्याआधी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि  सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तर, निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील तसंच राज्यातील काही भागात नागरिकांचे झालेले नुकसान मोठे आहे. यांना अधिक दराने मदत करण्याची गरज होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) आणि केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) देण्यात येणाऱ्या प्रचलित दरांपेक्षा वाढीव मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने ९ जूनच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे चक्रीवादळाने नुकसान झालेल्या घरांच्या, शेतीच्या, कौटुंबिक साहित्यापोटी संबंधित कुटुंबांना आता प्रचलित नियमांपेक्षा अधिक दराने मदत मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं- शरद पवार

‘अशी’ मिळेल मदत

  • निसर्ग चक्रीवादळामुळे पक्क्या घराचं पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना ९५ हजार १०० रुपयांऐवजी सुधारित दरांनुसार दीड लाख रुपये मदत मिळेल.
  • पक्क्या किंवा कच्च्या घरांचे अंशत: (किमान १५ टक्के) नुकसान झालेल्या कुटुंबांना ६ हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये मिळतील.
  • नष्ट झालेल्या झोपडीसाठी ६ हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये मदत मिळेल.
  • घर पूर्णत: कोसळलेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी २५०० रुपयांऐवजी ५ हजार प्रमाणे एकूण १० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
  • नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या ७५ टक्के मर्यादेत कमाल १० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आहे.
  • बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपयांप्रमाणे कमाल २ हेक्टरसाठी मदत मिळेल.

नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबे निश्चित करण्यात येतील. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मदतीच्या या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता असेल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

चक्रीवादळामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वीजेचे खांब कोसळले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वादळानं बाधित असलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील बाधित शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी ५ लिटर केरोसीन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.          

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा