Advertisement

पंतप्रधान मोदींनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं- शरद पवार

केंद्र सरकारने देखील चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदतीचा हात द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

पंतप्रधान मोदींनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं- शरद पवार
Image Source: Sharad Pawar's Twitter handle
SHARES

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड, कोकणातील जनतेला सध्या मदतीची गरज आहे. अशा स्थितीत त्यांना केंद्र सरकारने देखील मदतीचा हात द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांनी बुधवार १० जून २०२० रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. 

नुकसानीचा आढावा

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून देखील मदतीची अपेक्षा केली. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान केळशी, हर्णे, बाणकोट, मांदिवली, वेळास या गावांना भेट देऊन निसर्ग चक्रीवादळामुळे तिथे झालेल्या नुकसानाची पाहणी केली तसंच ग्रामस्थांकडून नुकसानाचा आढावा घेतला. प्रशासकीय यंत्रणा अजून सगळ्याच ठिकाणी पोहचलेली नाही, त्यामुळे अजून ही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

कोकणी माणूस पुन्हा कामाला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत तात्काळ गुरूवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल. गरज भासल्यास आम्ही केंद्राकडे मदतीची मागणी करू. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने हे करण्यात येईल. कोकणातील बहुतांश भागाचे चक्रीवादळामुळे नुकसान झालं असतानाही इथला माणूस खचून गेला नाही तर पुन्हा कामाला लागला आहे. पर्यटन क्षेत्राचंही मोठं नुकसान झालं आहे. या क्षेत्राला उभारी देण्यासंबंधीही विचार बैठकीत केला जाईल, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा- सर्कशीत विदुषकाची कमी, शरद पवारांचं राजनाथ सिंग यांना प्रत्युत्तर

केंद्राने मदत करावी

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा स्थितीत या जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. इथल्या सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी केवळ आर्थिक पॅकेजचीच आवश्यकता आहे, असंही नाही. तर त्यांना इतरही वेगवेगळ्या प्रकारे मदत करता येऊ शकते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये आलेल्या अम्फन चक्रीवादळानंतर तेथील जनतेला मदत केली हाेती. त्याचपद्धतीने इथंही मदत करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदींनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

पवार यांनी मंगळवारी रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, दिवेआगार इत्यादी ठिकाणी झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रायगडच्या पालक मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे आणि स्थानिक आमदार उपस्थित होते. 

त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडसाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती. 

हेही वाचा- शरद पवारांना उशीरा जाग आलीय- चंद्रकांत पाटील

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा