SHARE

भारतीय जनता पार्टीच्या स्थापनादिनी अर्थात ६ एप्रिल रोजी मुंबईत ‘महाभाजपा, महामेळावा’ होणार आहे. या मेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभणार असून संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची महिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.


काय म्हणाले दानवे?

या मेळाव्याला राज्याच्या सर्व भागातून, खेड्यापाड्यातून, गावागावातून आणि प्रत्येक शहरातून पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कामगिरीमुळे समाजाच्या सर्व घटकांमध्ये पक्षाचे स्थान निर्माण झाले असून भाजप म्हणजेच विकास असे चित्र निर्माण झाले आहे. केंद्र सरकारसह २१ राज्यांमध्ये भाजपचे स्वतःचे किंवा आघाडीचे सरकार आहे. भाजपचे राज्यात एक कोटी प्राथमिक सदस्य आहेत. पक्ष पदाधिकारी, मोर्चे-आघाड्या यांचे प्रदेश ते मंडल स्तरापर्यंत दोन लाखाहून अधिक पदाधिकारी आहेत. बूथरचनेचे काम यशस्वी झाले असून राज्यातील ९२ हजारपैकी ८३ हजार बूथमध्ये ‘वन बूथ, २५ युथ’ ही मोहीम यशस्वी झाली आहे.


बूथ चलो अभियान

मुंबईतील ६ एप्रिलच्या महामेळाव्यापूर्वी राज्यभर भाजप कार्यकर्ते ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ‘बूथ चलो अभियान’ राबविणार आहेत. या काळात प्रत्येक बूथप्रमुख व पेजप्रमुखाच्या घरावर भाजपचे झेंडे लावण्यात येतील. बूथमधील कार्यकर्ते व नागरिकांच्या बैठका आयोजित करण्यात येतील तसेच खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिकांना भाजप सरकारच्या विकासकामांची माहिती देतील. याचप्रमाणे बूथमधील एका ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने पक्षातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार अाहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या