Advertisement

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शहांच्या वक्तव्यामुळं शिवसेना दबावात..?

जागा वाटपाचा तिढा सुटत नसेल, तर भाजप स्वबळावर लढून सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे. असंच शहा यांनी एकप्रकारे सूचित केल्याचं म्हटलं जात आहे.

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शहांच्या वक्तव्यामुळं शिवसेना दबावात..?
SHARES

महाराष्ट्रात भाजपचं सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत येणार असा आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात व्यक्त केल्याने जागा वाटपाच्या चर्चेत शिवसेनेवरील दबाव वाढल्याचं म्हटलं जात आहे. जागा वाटपाचा तिढा सुटत नसेल, तर भाजप स्वबळावर लढून सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे. असंच शहा यांनी एकप्रकारे सूचित केल्याचं म्हटलं जात आहे. 

एवढंच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं म्हणत शहा यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरही पाणी फेरलं. शिवसेना आदित्य ठाकरे यांना पुढं करून मुख्यमंत्रीपदाची मागणी देखील करत आहे.

स्वबळावर सरकार

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपच्या वतीने गोरेगाव येथील नेस्को संकुलात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले अमित शहा यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचा उल्लेख न करताच राज्यात भाजपाचं सरकार बहुमताने आणण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसंच कार्यक्रमानंतर मातोश्रीवर जाणं किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेण्याचंही शहा यांनी टाळलं. यावरून भाजप जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेनेला इशारा

भाजपने काही दिवसांपूर्वी अंतर्गत सर्व्हे केला होता. या सर्व्हेनुसार राज्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यास भाजपच्या जागा वाढतील, तर शिवसेनेच्या कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने भाजपचे बहुसंख्य नेते स्वबळावर लढण्यास आग्रही आहे. परंतु लोकसभेआधी शिवसेना नेतृत्वाला शब्दा दिलेला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवण्यावर जोर आहे.

मात्र जर शिवसेना- भाजपच्या फाॅर्म्युल्यानुसार जागा वाटपाला तयार नसेल, तर स्वबळावर लढू असा इशारा आता भाजप पक्ष नेतृत्व देऊ लागल्याने शिवसेनेला भाजपपुढं नमतं घ्यावं लागणार असं दिसून येत आहे. सध्या तरी शिवसेनेचे नेते अमित शहा यांचं विधान आम्हाला ठाऊक नसल्याचं म्हणत कानावर हात ठेवत आहेत.

कलम ३७० चा मुद्दा देशभक्तीचा 

जम्मू व काश्मीरचा प्रश्न किंवा ३७०वे कलम हा भाजपसाठी राजकारणाचा विषय नसून देशभक्तीचा आहे. देशहिताच्या निर्णयाला समर्थन मिळावं व विधानसभेत जनतेने भाजपला बहुमत द्यावं, असं आवाहन शहा यांनी केलं. राज्यातील प्रत्येक घराघरात जाऊन कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती नागरिकांना द्यावी, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.हेही वाचा-

Vidhan Sabha Election 2019: शिवसेनेला ११८ जागा देण्यास भाजप तयार

युतीचा फाॅर्म्युला लोकसभेलाच ठरलाय- उद्धव ठाकरेसंबंधित विषय
Advertisement