इंधनदरवाढीच्या भडक्यावर भाजपाचे हात वर, सर्वसामान्यांना दिलासा नाही?

केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत इंधनाच्या किंमती नियंत्रित करणं हे आमच्या हातात नाही, असं स्पष्ट करत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. तर इंधनवाढ अशीच सुरू राहणार याचे संकेतही दिले आहे.

SHARE

पेट्रोल-डिझेल-गॅसच्या दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. काँग्रेस आणि विरोधकांनी तर या मुद्द्यावर केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रस्त्यावर उतरत भारत बंदची पुकारला आहे. इंधनवाढ कमी होणार का? हाच सवाल विरोधकांसह सर्वसामान्यांचा आहे. असं असताना केंद्र सरकारनं मात्र इंधनवाढ नियंत्रणात आणता येत नसल्याचं म्हणत चक्क हात वर केले आहेत.

केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत इंधनाच्या किंमती नियंत्रित करणं हे आमच्या हातात नाही, असं स्पष्ट करत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. तर इंधनवाढ अशीच सुरू राहणार याचे संकेतही दिले आहे.


इंधन दरवाढ सुरूच

मागील १६ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोलचे दर सोमवारी २३ पैशांनी महागलं असून पेट्रोलचे दर ८८ रुपये १२ पैसे असे झाले आहेत. तर डिझेलचे दरही २३ पैशांनी महागल्यानं डिझेलचे दर ७७ रुपये ३२ पैसे झाले आहेत. इंधनामध्ये झालेल्या या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. कारण जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती आपोआपच या इंधनदरवाढीमुळं वाढत चालल्या आहेत.


भाजपानं केले हात वर

वाढत्या इंधनदरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सोमवारी भारत बंद पुकारला आहे. मुंबईसह देशभर भारत बंद शांततेत सुरू असलं तरी काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं आहे. इंधनाचे दर कमी व्हावेत हीच मागणी सर्वसामान्यांची आणि विरोधकांची आहे. असं असताना भाजपानं मात्र चक्क इंधनदरवाढीवरून हात वर केले आहेत. रवी शंकर प्रसाद यांनी दर रोखणं आपल्या हातात नाही. इंधनाचे दर हे तेल कंपन्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


विरोधकांना टार्गेट

तर दुसरीकडे भारत बंदच्या मुद्यावरून विरोधकांना टार्गेट करत भारत बंदच्या नावाखाली काँग्रेस आणि विरोधकांकडून हिंसा होत असल्याचं रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. बंदच्या दरम्यान बिहारमध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवालही केला आहे. जनता इंधनदरवाढीमुळं हैराण आहे, पण त्यामुळे जनता विरोधकांसोबत आहे असं नाही, असं म्हणत विरोधकांवर जोरदार टीकाही केली आहे.हेही वाचा - 

मुंबई-ठाणे-नवी मुंबईत बंदला सुरुवात, मनसे-काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

'भारत बंद'नंतरही पेट्रोल दरवाढ काही थांबेना!संबंधित विषय
ताज्या बातम्या