Advertisement

‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी ठाकरे सरकारची अवस्था

रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधानं पाहता ठाकरे सरकारची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झाली आहे, अशी खोचक टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी ठाकरे सरकारची अवस्था
SHARES

रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधानं पाहता ठाकरे सरकारची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झाली आहे, अशी खोचक टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. मुंबईतील भाजप (bjp) प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, महाराष्ट्रातील (maharashtra) कठोर निर्बंध हे केवळ आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच शनिवारी आणि रविवारी असतील. दोनच दिवस पूर्ण लाॅकडाऊन असेल आणि इतर दिवशी ठराविक निर्बंधांसह व्यवहार सुरळीत चालू राहतील, असं ठाकरे सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यावर सांगितलं होतं. जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही या मंत्र्यांनी आवर्जून सांगितलं होतं.

हेही वाचा- महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक

प्रत्यक्षात मात्र पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकानं जबरदस्तीने बंद केले. सरकारला जर अघोषित लाॅकडाऊन करून उद्योगधंदे बंदच करायचे असतील, तर गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्यांना मदतीचं पॅकेज दिलं पाहिजे. मात्र, मुख्यमंत्री निर्णय जाहीर करून ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचं काय होत आहे हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसेल काय? सरकार एवढं निर्दयी कसं असू शकते?, असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला.

काही दिवसांपर्यंत राज्यातील अर्थचक्र गतिमान करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या वसुली सरकारने अप्रत्यक्ष लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्थेचं चक्र पूर्णत: ठप्प केलं आहे. या अवघड काळात सरकारने वीज बिलांची वसुली थांबवण्याचा निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र, सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केलं आहे. केवळ जनतेची पिळवणूक हेच या सरकारचं धोरण आहे हे आता स्पष्ट होत आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

राज्य सरकार जनतेची फसवणूक तर करत आहेच; पण सरकारमधील गोंधळ पाहून ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी अवस्था ठाकरे सरकारची झाल्याचं बघायला मिळत आहे, असं केशव उपाध्ये म्हणाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा