Advertisement

‘त्या’ प्रत्येक जागेवर ओबीसी उमेदवार, भाजपचा निर्णय

प्रत्येक जागांवर ओबीसी समाजातूनच उमेदवार देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

‘त्या’ प्रत्येक जागेवर ओबीसी उमेदवार, भाजपचा निर्णय
SHARES

एका बाजूला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच राज्यातील काही जागांवर पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती भाजपने आखली आहे. निवडणुकीच्या प्रत्येक जागांवर ओबीसी समाजातूनच उमेदवार देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. 

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसींचं राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. ओबीसी आरक्षणावर १५ महिने वेळकाढूपणाचं धोरण, याप्रश्नी केवळ मागासवर्ग आयोग तयार करायचा होता, परंतु तो न केल्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केलं. परिणामी मागील ४० ते ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच ओबीसींना राज्यात कुठलंही राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलेलं नाही. 

एकही राखीव जागा नाही

म्हणन आम्ही या संदर्भात एक मागणी केली होती की, जोपर्यंत राजकीय आरक्षण बहाल होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. सरकारने तशी घोषणा केली होती. सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं की मी आताच मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय, त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे कुठलीही निवडणूक होणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. म्हणजे आता पहिल्या टप्प्यात ५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्या यामध्ये ओबीसींकरीता एकही राखीव जागा राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा- केंद्राच्या भूमिकेमुळेच ओबीसींचं नुकसान, छगन भुजबळ यांचा आरोप

कोरोनात प्रचार करायचा कसा?

आम्ही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि राज्यपालांनाही भेटून विनंती केली आहे की या निवडणुका तात्काळ पुढं ढकला. एकीकडे कोरोनाचं कारण देऊन जर तुम्ही अधिवेशन घेत नाही, तर कोरोनात प्रचार करायचा कसा? सभा घ्यायच्या कशा? पुन्हा त्याने कोरोना वाढत नाही का? ही दुटप्पी भूमिका बंद करा. ओबीसींच्या विरोधात राज्य सरकारकडून जो विश्वासघात केला जातोय, तो बंद झाला पाहिजे, असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.

आम्ही ओबीसींच्या हिताच्या बाजूने आहोत, असं म्हणणाऱ्या राज्य सरकारमधील सर्वांना आमचं आव्हान आहे की, राज्य सरकारकडे अधिकार आहेत, त्यांनी सरकारकडून कृती करून घ्यावी, निवडणुका पुढं ढकलून घ्याव्यात, जोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण बहाल होत नाही, तोपर्यंत या निवडणुका घेण्यात येऊ नये.

आमचे अध्यक्ष आणि कोअर कमिटीने चर्चा करून निर्णय घेतलाय की, ज्या जागांवर निवडणुका होतील, तिथं आमचा उमेदवार विजयी होईल की नाही, याचा कोणताही विचार न करता केवळ आणि केवळ ओबीसी समाजातूनच उमेदवार देण्यात येईल. ओबीसी आरक्षणासाठी आमचा लढा अखेरपर्यंत सुरू राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(bjp will only give obc candidate in zp election in maharashtra says devendra fadnavis)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा