Advertisement

ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, देवेंद्र फडणवीस संतापले

या निवडणुका जर रद्द केल्या नाहीत, पुढं ढकलल्या नाहीत तर भाजप याविरोधात उग्र आंदोलन करेल, असा इशारा मी राज्य सरकारला या ठिकाणी देतोय.

ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, देवेंद्र फडणवीस संतापले
SHARES

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं आहे. एकाबाजूला सरकारमधील मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोवर निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात. अशा प्रकारे ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिला आहे.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण संपल्यानंतर वारंवार सरकारने आश्वस्त केलं की आम्ही यासंदर्भातील कारवाई करू. ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं, की जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्वरत होत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी या निवडणुका घोषित होतात. हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. 

हेही वाचा- "वराती मागून घोडे" असाच राज्यातील भाजप नेत्यांचा कारभार- विजय वडेट्टीवार

ओबीसींचं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट सरकारच्या वतीने घातला जातोय, हे आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करून या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. या निवडणुका जर रद्द केल्या नाहीत, पुढं ढकलल्या नाहीत तर भाजप (bjp) याविरोधात उग्र आंदोलन करेल, असा इशारा मी राज्य सरकारला या ठिकाणी देतोय. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचा विश्वासघात बंद करा, अशा प्रकारचं राज्य सरकारला आमचं आव्हान आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू नयेत, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढं मांडली आहे. ही चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यामुळेच या निवडणुका पुढं ढकलण्याचा सरकारचा विचार आहे. विषय असा आहे की कुठूनही कितीही दबाव आला, तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत या निवडणुका आम्ही मंत्री असलो, तरी होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला होता.

(bjp leader devendra fadnavis demands to cancel election on obc reservation issue in maharashtra)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा