Advertisement

पुण्यात उभारलेल्या मंदिरातून पंतप्रधान मोदींची मूर्ती हटवली, राष्ट्रवादीचं आंदोलन

रातोरात पंतप्रधान मोदींची मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीनं देवच चोरीला गेल्यानं आंदोलन केलं.

पुण्यात उभारलेल्या मंदिरातून पंतप्रधान मोदींची मूर्ती हटवली, राष्ट्रवादीचं आंदोलन
SHARES

पुण्यात उभारलेलं मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एका समर्थकानं मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. औंध परिसरात उभारण्यात आलेलं हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.

पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते.

या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता.

पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर इथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता.

मयूर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावली होती. तसंच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण यावरून टीका करण्यात आली होती.

रातोरात पंतप्रधान मोदींची मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीनं देवच चोरीला गेल्यानं आंदोलन केलं. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमच्या नवसाला कोण पावणार? असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? असं म्हणत राष्ट्रवादीनं आंदोलन केलं.



हेही वाचा

विकासकामे करताना स्थानिक संस्कृती, परंपरा जपा- उद्धव ठाकरे

न्यायपालिकेची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचं काम कोणाच्या इशाऱ्यावर?- नाना पटोले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा