Advertisement

आम्ही सारे महापौर!


आम्ही सारे महापौर!
SHARES

मुंबईचे महापौर किती? तुम्ही म्हणाल काय आचरटपणा लावलाय! अहो एकच की! पण आम्ही म्हणतो सर्वच. सामान्य ज्ञान तुमचे कितीही चांगले असले तरी मुंबईचे सर्वच नगरसेवक हे महापौर आहेत, हे आपण नाकारू शकत नाही. महापौर पद हे तांत्रिकदृष्ट्या एकच असले तरी कागदोपत्री मात्र सर्वच नगरसेवकांना महापौर बनवण्याची किमया साधली गेली आहे. लेटरहेडच्या माध्यमातून का होईना जवळपास सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी महापौरांचा मान मिळवला आहे. मात्र, नगरसेवकांच्या शुल्लक चुकीकडे चिटणीस विभागाचे लक्षही नाही.

मुंबई महापालिकेच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीबाबत नियम व विनियम बनवण्यात आले असून, यामध्ये महापौर, उपमहापौर, समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी यांना आपले लेटर हेड आणि त्यावर प्रकाशित करण्यात येणारे बोधचिन्ह याचे काही नियम निश्चित केले आहेत. जसे की महापौर आणि उपमहापौर यांना आपले लेटर हेड हे नैसर्गिक रंगात छापणे बंधनकारक आहे. अर्थात बोधचिन्ह हे वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात रंगीत छापले जावे. तर वैधानिक, विशेष समित्यांच्या अध्यक्षांना ही लेटरहेड हिरव्या रंगात छापली जावीत, असा नियम आहे. मात्र, नगरसेवकांनी आपली लेटर हेड ही निळ्या रंगातच छापावी सुस्पष्ट नियम असताना जवळपास शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी नैसर्गिक रंगात लेटर हेड छापली आहेत. 

नगरसेवकांनी आपली लेटरहेड निळ्या रंगातच छापणे अपेक्षित आहे. परंतु ही महापौरांप्रमाणे लेटरहेड छापून एकप्रकारे शासकीय कामकाज प्रणालीच्या नियमांनाच हरताळ फासण्याचे काम नगरसेवकांकडून होत आहे. मात्र यावर चिटणीस विभागाचेच लक्ष नसल्याचे दिसत आहे. चिटणीस विभागामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही चूक आपल्याकडून झाली असल्याचे त्यांनी मान्य केले. चिटणीस विभागाने 'तुम्ही बाहेरुन लेटरहेड छापून घ्या, तुम्हाला बाहेरून छापून मिळतील, ' असे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बाहेरून छापून घेतली. छापल्यानंतर ही बाब आपल्या लक्षात आली आहे. त्यामुळे आपण नवीन लेटरहेड पुन्हा छापली आहे. परंतु चिटणीस विभाग याबाबत गंभीर नसून, नवीन नगरसेवकांना ते कोणतेही मार्गदर्शन करत नाहीत, त्यामुळेच हा घोळ निर्माण झाल्याचा आरोप राजूल पटेल यांनी केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा