मतपेटीत बंद होणार २२७५ उमेदवारांचे भवितव्य

Mumbai
मतपेटीत बंद होणार २२७५ उमेदवारांचे भवितव्य
मतपेटीत बंद होणार २२७५ उमेदवारांचे भवितव्य
मतपेटीत बंद होणार २२७५ उमेदवारांचे भवितव्य
मतपेटीत बंद होणार २२७५ उमेदवारांचे भवितव्य
See all
मुंबई  -  

मुंबई - मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्यानंतर मंगळवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मुंबईत एकूण २२७५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदानाचा हक्क बजावत मतदार या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत असून, ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन आणि निवडणूक अयोग सज्ज झाले आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये या मतदानासाठी एकूण १५८२ ठिकाणी ७३०४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदानाची ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण ४२,७९४ कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व निवडणूक प्रकियेसाठी २३ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर सरासरी ८ ते १३ निवडणूक प्रभागांची जबाबदारी आहे. महापालिकेच्या वतीने मतदारांना मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर

महापालिका निवडणुकीत १७ अतिसंवेदनशील आणि ६८८ संवेदनशील मतदार केंद्र आहेत. या सर्व संवेदनशील मतदान केंद्रांवर यंदा पोलिसांची करडी नजर आहे. याठिकाणी पोलिसांमार्फत आवश्यक ते पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर अतिसंवेदनशील केंद्रांबाहेर वेब कास्ट कॅमेरे लावले जाणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली आहे.

मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांची कुंडली
मतदान केंद्रांबाहेर यंदा प्रथमच उमेदवारांच्या मालमत्ता आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांचे शिक्षण, त्यांचे उत्पन्न आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याची माहिती बॅनरवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

चूहा मीटिंग जोरात

प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्यामुळे रविवारी आणि सोमवारी रात्री उमेदवारांच्या आणि पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. ज्या ज्या भागांमध्ये प्रतिस्पर्ध्याला जास्त मतदान होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला मतदान होणार नाही, अशी ठिकाणे निश्चित करून रात्रीच्या अंधारात गुप्त ठिकाणी भेट घेऊन ती मते फोडण्यासाठी चक्क सौदा केला जातो. रात्रीच्या वेळी गुप्त ठिकाणी केल्या जाणाऱ्या या बैठकांना चूहा मीटिंग म्हणून संबोधले जाते. मात्र, यंदा नोटाबंदीमुळे पैसे वाटपाचे प्रमाण कमी असल्याने इतर कामाची अर्थात सीसीटीव्ही कॅमेरा जोडणीसह इतर कामे करून घेण्याची आश्वासने आणि टोकन घेण्यासाठी या चूहा मिटींग घेण्यात येत असल्याचे समजते.

निवडणूक रिंगणात शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार

महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक अर्थात २२७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याखालोखाल काँग्रेस-२२१, भाजपा-२११, मनसे-२०१, राष्ट्रवादी काँग्रेस-१७१, बीएसपी-१०९, समाजवादी पार्टी-७६, एआयएमआयएम-५६, अन्य मान्यताप्राप्त पक्ष-२५१ आणि अपक्ष-७१७ असे एकूण २२७५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.