Advertisement

राजकारणात उतरून बदल घडवायचाय, उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बुधवारी रंगीला गर्ल बाॅलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (४५) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. ९० च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

राजकारणात उतरून बदल घडवायचाय, उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश
SHARES

निवडणुकीचा मोसम असल्याने सध्या दर दिवसाआड सिनेसृष्टीतील तारे राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. त्यातच बुधवारी रंगीला गर्ल बाॅलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (४५) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. ९० च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

उर्मिला मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्या संपर्कात होती. मात्र लोकसभेचं तिकीट नक्की झाल्यानंतर तिने काँग्रेस प्रवेश निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय निरूपम, मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे प्रवक्ते रणदीत सुरजेवाला यांच्या उपस्थितीत तिच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना उर्मिला म्हणाली, ''मी निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर समाजसेवा करण्यासाठी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. मागील ५ वर्षांच्या काळात देशातील नागरिकांवर असंख्य प्रकारची बंधने आली आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आली आहे. आचारा-विचारांवर मर्यादा आल्या आहेत. हे सगळं बदलावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे केवळ विचार करण्यापेक्षा राजकारणात उतरून बदल घडवण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे.''

मुंबईमधील लोकसभेच्या ६ जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उर्मिला मराठी असल्याचा काँग्रेसला फायदा मिळेल असं म्हटलं जात आहे. उर्मिलाला तिकीट मिळाल्यास तिची टक्कर भाजपाचे लोकप्रिय उमेदवार गोपाळ शेट्टीसोबत होईल.

१९८३ मध्ये आलेल्या मासूम सिनेमाद्वारे उर्मिलाने बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर चमत्कार, रंगीला, जुदाई, खुबसूरत, भूत, अशा अनेक सिनेमांद्वारे तिने ९० च्या दशकांत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. उर्मिलाने २०१६ मध्ये काश्मीरमधील बिझनेसमन मीर मोहसीन अख्तर याच्यासोबत लग्न केलं होतं. आता राजकारणात प्रवेश करणारी उर्मिला कुठले रंग दाखवते हे येणाऱ्या काळात दिसून येईलच.हेही वाचा-

काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला मिळणार उत्तर मुंबईतील उमेदवारी?

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यताRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा