रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदार संघात भाजपाकडून गोपाळ शेट्टी रिंगणात आहे. उर्मिलाला उमेदवारी मिळाल्यास इथली निवडणूक चांगलीच ग्लॅमरस होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्यास नाखूश असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे त्यांना उत्तर पश्चिम मतदार संघातून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतून कोणाला तिकीट द्यायचं यावर अजून काँग्रेसचं एकमत झालेलं नाही.
उत्तर मुंबई हा भाजपाचा गड समजला जातो. या मतदार संघात गोपाळ शेट्टी तगडे उमेदवार असल्याने त्यांना हरवणं सोपी बाब नसल्याची जाणीव काँग्रेसला आहे. त्यामुळेच काँग्रेस इथं लोकप्रिय चेहरा उतरवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातच उर्मिला मातोंडकरला पक्षात प्रवेश देत या जागेवर उभं करण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्याची माहिती पुढं येत आहे.
सोबतच या मतदारसंघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस अधिकृतरित्या कुणाला तिकीट देते, यावर सस्पेंन्स कायम आहे.
याआधी काँग्रेसने २००४ मध्ये उत्तर मुंबईतून अभिनेता गोविंदाला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं होतं. तेव्हा गोविंदाने भाजपाचे तगडे उमेदवार राम नाईक यांचा दणदणीत पराभव केला होता. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस करू पहात आहे.
हेही वाचा-
आठवलेंची लोकसभेतून माघार, मुख्यमंत्र्यांनी दिलं राज्यसभेचं आश्वासन
काँग्रेसच्या सातव्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार; निरूपम मात्र प्रतिक्षेतच