मुंबई - सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. सकाळी अकरा वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सरकार सबका साथ सबका विकास या तत्वाने विकास करत आहे. कृषी संजीवनी प्रकल्प, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असा उल्लेख यावेळी राज्यपालांनी केला.
पहिल्याच दिवशी विधान परिषदेच्या सदस्यांना टॅब वाटण्यात आले आहेत. यामुळे कागदपत्रांचा वापर कमी होऊन पेपरलेस कारभाराच्या दिशेने प्रयत्न होणार आहेत. शनिवारी 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. 7 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 13 विधेयके सादर करण्यात येणार आहेत. दरम्यान विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली.