Advertisement

धर्मा पाटलांच्या जमीन अधिग्रहण प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश


धर्मा पाटलांच्या जमीन अधिग्रहण प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
SHARES

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या बऱ्याच फैरी झाडल्या गेल्या. सोबतच आत्तापर्यंत उडवाउडवी करणाऱ्या सरकारने धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या हालचालीही सुरु केल्या आहेत. याच पार्शवभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमीन अधिग्रहणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. तसेच, आठवड्याभरात या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.


मृत्यूनंतर सरकारला आली जाग

अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पाटील यांच्या निधनानंतर सरकारचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत पार्थिव ताब्यात न घेणाऱ्या नरेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनेच समजूत काढण्यात आली होती. नरेंद्र पाटील यांना जमिनीचा मोबदला कमी कसा मिळाला? याबाबत चौकशी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.


अखेर मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. सरकारवर चौफेर टीका होत असून मंत्रिमंडळातील नेत्यांवर विरोधकांनी आरोपही केले आहेत. त्यामुळे धर्मा पाटील यांच्या जमीन अधिग्रहण आणि मोबदल्याचे प्रकरण सरकारच्या अंगाशी आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी यातील नेमके दोषी अधिकारी कोण? हे शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा