Advertisement

काँग्रेसला नकोय राष्ट्रवादीची साथ, स्वबळावर लढवणार निवडणूक ?

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा कुठलाही फायदा होत नसल्याने शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेसच्या बहुतेक आमदारांनी एकतर ‘वंचित’ला सोबत घ्या किंवा स्वबळावर निवडणूक लढवा अशा सूचना पक्षश्रेष्ठींना केल्या.

काँग्रेसला नकोय राष्ट्रवादीची साथ, स्वबळावर लढवणार निवडणूक ?
SHARES

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी झाली आहे. आपला पारंपरिक मित्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा कुठलाही फायदा होत नसल्याने शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेसच्या बहुतेक आमदारांनी एकतर ‘वंचित’ला सोबत घ्या किंवा स्वबळावर निवडणूक लढवा अशा सूचना पक्षश्रेष्ठींना केल्या.  

वंचितचा पर्याय

या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.  बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला मदत करत नाहीत, अशी तक्रार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केली. उलट राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी प्रतिस्पर्धी भाजपालाच मदत करत असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा पर्याय अनेकांनी सुचवला. 

तसं शक्य नसेल तर कुणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवावी, असा सूरही अनेक नेत्यांनी आळवला. या पर्यायांवर विचार करण्याचं आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलं. पुढील २ दिवस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नेते, पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक होणार आहे. 

फोडाफोडीचा आरोप

बैठक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधताना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोन करुन फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री तसंच काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करुन भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भाजपाच्या गळाला काहीही लागणार नाही', असं चव्हाण म्हणाले. 

या आरोपांना उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, चव्हाण यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसचेच नेते स्वत:हून भाजपा नेत्यांशी संपर्क साधत आहेत. आताही माझ्याकडे २५ हून अधिक जणांची यादी आहे, असं महाजन म्हणाले.



हेही वाचा-

मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी? मुख्यमंत्र्यांनी केली अमित शहांसोबत चर्चा

भाजपाचा युवा मोर्चा अध्यक्ष बँकेचा ‘विलफूल डिफाॅल्टर’!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा