Advertisement

मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी? मुख्यमंत्र्यांनी केली अमित शहांसोबत चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांच्या समावेशावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी? मुख्यमंत्र्यांनी केली अमित शहांसोबत चर्चा
SHARES

राज्यातील भारतीय जनता पक्षा (भाजपा)च्या कोअर कमिटीची बैठक होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांच्या समावेशावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रीमंडळ विस्तारासोबतच शिवसेनेसोबतच्या जागा वाटपावरही प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

विखेंचा मार्ग मोकळा? 

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीआधी मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या मंत्रीमंडळात कुठल्या नव्या चेहऱ्याला संधी द्यायची? कुणाला डच्चू द्यायचा? यावर चर्चा करण्यात आली. लोकायुक्तांनी ताडदेव एसआरए घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होईल, असं म्हटलं जात आहे. तसं झाल्यास काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु त्यांच्यापाठोपाठ भाजपामध्ये दाखल होण्यास इच्छुक काँग्रेसचे अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर आणि इतर नेत्यांना भाजपात कसं दाखल करून घ्यायचं यावरही बराच खल झाल्याचं समजत आहे.  

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या सगळ्या जागा लढवल्या होत्या. परंतु यंदा युतीचा निर्णय झाल्याने उर्वरीत उमेदवारांचं काय करायचं? नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची? त्यातूनही बंडखोरी झाल्यास ती कशी मोडायची, असा प्रश्नही भाजपापुढं उभा ठाकला आहे.   

 शिवसेना आक्रमक

सोबतच केंद्रातील मंत्रीपद आणि लोकसभा उपाध्यक्षपद यावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत किती जागा द्यायच्या यावरही मुख्यमंत्र्यांनी शहांसोबत चर्चा केली. २८८ जागांपैकी शिवसेनेने निम्म्या म्हणजेच १४४ जागा मागितल्या आहेत. आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम हे भाजपाचे मित्रपक्ष असल्याने त्यांच्यासाठी जागा सोडण्यास शिवसेनेची तयारी नाही.  तर भाजपा १३५, शिवसेना १३५ आणि मित्रपक्षांसाठी १८ जागा या सूत्रावर भाजपा ठाम आहे. त्यामुळे जागा वाटपाचा पेच वाढला आहे. हा पेच कसा सोडवायचा यावर मुख्यमंत्री आणि शहा यांच्यात चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. 

नवा प्रदेशाध्यक्ष कोण?

दुसऱ्या बाजूला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्षही भाजपाला निवडायचा आहे. या पदासाठी माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे किंवा हंसराज अहीर यांची नावे चर्चेत असल्याचं समजत आहे. तर भाजपा मुंबई अध्यक्ष पदासाठी मनोज कोटक यांचंही नाव पुढं येत आहे.  



हेही वाचा-
भाजपाचा युवा मोर्चा अध्यक्ष बँकेचा ‘विलफूल डिफाॅल्टर’!

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रीपद धोक्यात?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा