Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री समाधानी


मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री समाधानी
SHARES

मुंबई - शिवसेना मंत्र्यांनी आणि आमदारांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांनी तक्रार केली होती की भाजपाच्या आमदारांना विकास निधी जास्त दिला जातो तर शिवसेनेच्या आमदारांना विकास निधी देताना डावलले जात आहे. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकास निधी देताना भेदभाव आणि शेतकरी कर्जमाफी हे दोन मुद्दे शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक समाधानकारक झाल्याची माहिती यावेळी शिवसेना मंत्र्यांनी दिली.

निधी वाटपामध्ये अन्याय होणार नाही - रामदास कदम

'मुख्यमंत्र्यांनी आज ठोस आश्वासन दिलं आहे. निधी वाटपात कोणावरही अन्याय करणार नाही. हे सरकार शिवसेना आणि भाजपाचं सरकार आहे. यापूर्वी भाजपाच्या आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जात होता. आता यापुढे शिवसेना-भाजपाच्या आमदारांना समान निधी वाटप केलं जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे. अर्थसंकल्पात जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात आश्वासन दिलेलं आहे', असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.

कर्जमुक्ती होत नाही तोवर आमचा लढा सुरू राहील - एकनाथ शिंदे

“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय आहे. शिवसेना आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे”, तसेच शिवसेना आमदारांच्या विकासनिधीसंदर्भात समतोल साधला जाईल. ज्या मतदारांनी निवडून दिलं आहे. त्यांची विकासकामं करणं ही माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आमचीही प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. यापुढे शिवसेनेच्या कुठल्याच आमदाराची नाराजी राहाणार नाही, असा प्रयत्न मी करेन असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा