‘सामना’ टाळणारे मुख्यमंत्री

 Mumbai
‘सामना’ टाळणारे मुख्यमंत्री

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सुसंस्कृत स्वभाव, फर्ड वक्तृत्व, अफाट वाचन आदी गुणविशेष आणि सवयींसाठी ओळखले जातात. विधिमंडळ राजकारणात त्यांनी ही ओळख प्रयत्नपूर्वक जपली आहे. राज्यातल्या राजकीय, सामाजिक आणि इतर घडामोडींची अधिकची माहिती मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दररोज वृत्तपत्रं वाचण्यासाठी वेळ काढावाच लागत असणार, हे उघड आहे. मुख्यमंत्री मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतली जवळपास सर्वच वृत्तपत्रं वाचतात. पण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या वाट्याला ते जात नाहीत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हे मान्य केलं आहे. आपण ‘सामना’ वाचत नाही, अशी स्पष्टोक्ति मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबईत एका माध्यम समुहाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात, “तुम्ही सकाळी उठल्यावर ‘सामना’ वाचता तेव्हा नेमकं काय वाटतं?” या प्रश्नावर हजरजबाबी मुख्यमंत्र्यांनी “तुम्ही सामना वाचता. मी सामना वाचत नाही.” असं उत्तर देत प्रश्नकर्त्याला काही क्षणांसाठी निरुत्तर केलं.

भाजपाचा जुना मित्रपक्ष आणि सध्या फक्त सत्तेतला सहकारी असलेल्या शिवसेनेची जळजळीत रोखठोक भूमिका हे ‘सामना’चं वैशिष्ट्य ठरलं आहे. शिवसेनेची धोरणं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भलामण करणाऱ्या ‘सामना’नं भाजपावर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. भाजपासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ टीका करण्याचे प्रसंगही 'सामना'ने साजरे केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपण ‘सामना’ वाचतच नसल्याचं सांगणं हा शिवसेनेला आणि विशेषत्वाने ‘सामना’चे कार्यकारी संपादक तसंच शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना लगावलेला टोलाच मानला जात आहे.

Loading Comments