राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. (cm uddhav thackeray takes a review on heavy rainfall in maharashtra)
पंढरपुरातील कुंभार घाट इथं अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा - शनिवार-रविवारच्या पावसाची विक्रमी नोंद, दशकातील दुसरा सर्वाधिक पाऊस
परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळपासूनच आढावा घेणं सुरु केलं. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसंच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच, त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तालय, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वय राखण्यात यावा. आवश्यक त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसंच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांसह आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत व अन्य आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणांना सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष राज्यातील जिल्हा कक्षांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून समन्वय राखत आहे.