पार्किंगच्या मुद्द्यावरुन भाजपमध्ये 'पारदर्शी' मतभेद!

 BMC
पार्किंगच्या मुद्द्यावरुन भाजपमध्ये 'पारदर्शी' मतभेद!

महापालिकेच्या सुधारित वाहनतळ आणि शुल्क वाढीच्या धोरणाची अंमलबजावणी ' ए' विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रायोगिक तत्वावर केली जात आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीस स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचा गळा भाजपाचे आमदार राज पुरोहित काढत असतांना त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर यांनी हे धोरण आवश्यक असल्याचे सांगितले आहे. स्थानिकांनी हे धोरण राबवले गेले पाहिजे, असे पत्र दिल्याचे नार्वेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे सशुल्क वाहनतळावरून केवळ राजकारण केले जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे धोरणाच्या अंमलबजावणीवरून भाजपात दुफळी निर्माण झाल्याचे दिसून येते.

सशुल्क वाहनतळ धोरणाच्या प्रत्यक्ष अमलबजावणीसाठी महापालिका 'ए' विभागाच्यावतीने कंत्राटाकरता निविदा काढल्या जात आहे. त्यामुळे याला आपला विरोध असल्याचे पुन्हा भाजपाचे राज पुरोहित यांनी जाहीर केले. यापूर्वी सभागृहात हे धोरण मंजूर झाल्यावर राज पुरोहित यांनी राहिवाशांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या धोरणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयात असलेल्या याचिकेचा निकाल लागला आणि सरकारनेही स्थगिती उठवली. त्यानुसार ए विभाग कार्यालयात या नव्या वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाचे कुलाब्यातील आमदार राज पुरोहित यांनी रहिवाशांसह बुधवारी ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला. पुरोहित यांनी नव्या वाहनतळ शुल्कवाढीच्या धोरणाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट करत या धोरणाची माहिती नागरिकांना दिली जावी,अशी मागणी केली आहे. यामधील वाढीव शुल्क हे परवडणारे नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपाचे कुलाब्यातील नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर यांनी मात्र, वाहनतळाच्या धोरणाचे समर्थन केले आहे. कुलाब्यातील अनेक सोसायटींनी हे धोरण आवश्यक असल्याचे पत्र आपल्याला दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुलाबा रेसिडेन्स असोशिएन्स, माय ड्रिम कुलाबा, ‘काम’एनजीओ, मेकर टॉवर असोशिएशन अशाप्रकारे 50 ते 60 इमारत सोसायटींनी आपल्याला हे धोरण राबवले जावे आणि याला आपला विरोध नसल्याचे कळवले आहे. कुलाबा भागात अनेक खासगी तसेच टॅक्सी आणि अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे बाहेरील वाहनांमुळे होणारा त्रास यामुळे कमी होणार असून, या धोरणामुळे येथील रहिवाशांना हक्काची वाहनतळाची जागाही मिळेल,असा विश्वासही नार्वेकर यांनी व्यक्त केला.

Loading Comments