Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने १७६७ कोटींची जमीन ३ कोटींना, काँग्रेसचा खळबळजनक अारोप

मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोची तब्बल १७६७ कोटी रुपयांची २४ एकर जमीन अवघ्या ३ कोटी रुपयांना बिल्डरांच्या घशात घातल्याचा खळबळजनक अारोप काँग्रेसने सोमवारी केला.

मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने १७६७ कोटींची जमीन ३ कोटींना, काँग्रेसचा खळबळजनक अारोप
SHARES

मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोची तब्बल १७६७ कोटी रुपयांची २४ एकर जमीन अवघ्या ३ कोटी रुपयांना बिल्डरांच्या घशात घातल्याचा खळबळजनक अारोप काँग्रेसने सोमवारी केला. या जमिनीची मनिष मखिजा आणि संजय भालेराव यांना कवडीमोल भावाने विक्री करण्यात आली असून, यामधील मनिष मखिजा हा भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.

सोमवारी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या जमिनीच्या विक्री घोटाळ्याचा अारोप करण्यात अाला. पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. मंत्रालयातील काही मंत्री आणि बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग या घोटाळ्यात असल्याचा अारोप काँग्रेसने केला.  


काय आहे घोटाळा ?

कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या ८ शेतकरी कुटुंबाना खारघर या ठिकाणी २४ एकर जमीन देण्यात आली होती. या ८ शेतकऱ्यांची जमीन पॅराडाईज बिल्डरचे मनिष मखिजा आणि संजय भालेराव यांनी १५ लाख रुपये प्रति एकर या कवडीमोल किंमतीने आणि दमदाटीने  अवघ्या ३ कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा अारोप काँग्रेसने केला अाहे. 

१४  मे २०१८ रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं आणि त्याच दिवशी या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी बिल्डरांना मिळाली. या सर्व प्रक्रियेला अनेक महिने लागत असताना त्याच दिवशी हा अधिकार कसा प्राप्त झाला, असे अनेक प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले. तसंच २३ जून २०१८ रोजी मनीष मखिजा आणि संजय भालेराव यांनी पोलीस फौजफाटा आणि सुरक्षा रक्षक घेऊन जमिनीचा ताबा घेतला आहे. काँग्रेसने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी केली. 


भाजपाने अारोप फेटाळले

भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी अाणि अामदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसने केलेल्या जमीन घोटाळ्याचा अारोप फेटाळला अाहे. काँग्रेसने केलेले अारोप खोटे अाणि निराधार अाहेत. या अारोपांमध्ये दम नाही. खोटी माहिती देऊन काँग्रेस जनतेची दिशाभूल करत अाहे, असं माधव भंडारी यांनी म्हटलं. तर खोटी बदनामी करणाऱ्यांविरोधात ५०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं.  



हेही वाचा - 

हिंमत असेल तर शासकीय वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढून दाखवाच– राज ठाकरे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा