Advertisement

चव्हाणांच्या राज्यात पगाराची वाण


चव्हाणांच्या राज्यात पगाराची वाण
SHARES

'देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षा'चा मान मिरवणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या कारभाराबाबत आनंदीआनंद आहे. प्रादेशिक आघाडीवरसुद्धा काँग्रेसची अवस्था बिकट आहे. 'घर फिरले की वासे फिरतात'च्या धर्तीवर सत्ता गेली की अर्थव्यवहारांवर मर्यादा येते, हे वास्तव मान्य करण्याची वेळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार ठरलेली तारीख उलटून गेल्यानंतर काही दिवसांनी मिळत आहेत. थोडक्यात, कर्मचाऱ्यांचे पगार तंगवले जात आहेत. पगार थकल्यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेण्याचं आव्हान काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पेलावं लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात गेले दोन महिने पगार झालेला नाही. तिथे पगारासाठी दरमहा सुमारे 6 लाख रुपये तरतूद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी ठरवण्यात आलेल्या एकूण वेतनाचा आकडा सुमारे दहा लाख रुपयांच्या आतच आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची दयनीय अवस्था झाल्याचा प्रभाव तिथल्या तिजोरीवरही पडला होता. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे की काय? अशी भीती प्रदेश कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे.


आधी 8 तारखेला होत असे पगार

दिन हैं सुहाना आज पहली तारीख हैं, अशी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची अवस्था कधीही नव्हती. महिन्याच्या आठ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होत असे. सात ते आठ महिन्यांपूर्वीपर्यंत पगाराच्या बाबतीत सारं आलबेल होतं. पण गणित बदलत गेलं. आठ तारखेला होणाऱ्या पगाराची तारीख सरकत आधी 15 नंतर 20 पर्यंत आली आणि कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा यायला सुरूवात झाली. प्रदेश कार्यालयात गेली काही वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वतःचं नाव न देण्याच्या अटीवर 'मुंबई लाइव्ह'ला ही माहिती दिली आहे.


तीन वर्ष पगारवाढ नाही

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची पार वासलात झाली. सत्ताधारी पक्ष पराभवाच्या गर्तेत फेकला गेला. याचा स्वाभाविक पगार पक्षाच्या तिजोरीवरही पडला असणारच. कोट्यवधींच्या 'पक्षनिधी'वर भारतीय जनता पार्टी, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष चालतात, हे उघड गुपीत आहे. राज्य आणि केंद्रात विरोधी बाकांवर फेकल्या गेलेल्या काँग्रेसने या दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांची पगारवाढ केलेली नाही. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी वारंवार केलेल्या विनंतीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


निलेश राणे यांनी वाहत्या गंगेत धुतले हात

दरम्यान, उत्तर प्रदेशमधल्या काँग्रेस प्रदेश कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार मिळालेला नाही, या एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा धागा पकडून पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत वादाला तोंड फोडलं आहे. निलेश राणे यांच्या ट्विटमुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरुद्ध निलेश राणे असा वादाचा दुसरा अंक रंगण्याची शक्यता आहे.



दरम्यान, पगाराला विलंब होत असल्याच्या बातमीचा काँग्रेसच्या वतीने इंकार करण्यात आला आहे.  


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून सर्व कर्मचाऱ्यांना अगदी वेळच्या वेळी पगार देण्यात येतो. पगाराला विलंब होतो, ही अफवा आहे. निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटबद्दल मला काहीही बोलायचं नाही.

राजू वाघमारे, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा