Advertisement

एकवेळेस शिवसेनेला सहन करू शकतो, पण.., पृथ्वीराज चव्हाणांचं परखड मत

काँग्रेस वारंवार स्वबळाचा नारा देत असल्याने काँग्रेसकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे. या सर्व परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

एकवेळेस शिवसेनेला सहन करू शकतो, पण.., पृथ्वीराज चव्हाणांचं परखड मत
SHARES

सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या संबंधांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वैचारीक मतभिन्नतेमुळे तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मनात खदखद असल्याची भावनाही व्यक्त होत आहे. अशातच काँग्रेस वारंवार स्वबळाचा नारा देत असल्याने काँग्रेसकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे. या सर्व परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधी शिवसेनेपासून सावध भूमिका घेतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, शिवसेनेच्या (shiv sena) पार्श्वभूमीमुळे त्यांच्या मनात थोडीशी शंका नक्कीच होती. परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील नेतृत्वाला आघाडीचं महत्त्व पटवून दिलं. शिवसेनेची विचारसरणी अशी आहे की, तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. शिवाय हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकवेळ आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपला (bjp) अजिबात नाही. 

हेही वाचा- ‘विनाकारण त्रास’ असा प्रकार सुरू असेल तर… शिवसेनेचा इशारा

महाविकास आघाडी सरकार संकटात आहे का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. बिलकूल नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांचं याबाबत एकमत असून सरकारला काँग्रेसचं पूर्ण पाठबळ आहे.

काँग्रेस सातत्याने स्वबळाचा नारा देत असल्याबद्दल विचारलं असता, काँग्रेस (congress) महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. काँग्रेस सत्तेत असली, तरी पक्ष काही जिल्ह्यांमध्ये अजूनही म्हणावा तितका मजबूत नाही. स्वबळाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या जास्त असेल, तर आमचा मुख्यमंत्री होईल. ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्या पक्षाचा मुख्यमंत्री अशी पद्धत आतापर्यंत राज्याच्या राजकारणात राहिली आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला दुबळी करत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाच्या भाषेवरून काँग्रेसला टोला लगावला होता.

(congress leader prithviraj chavan comment on alliance with shiv sena in maharashtra)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा