पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर विखेंचा भाजपात प्रवेश?

काँग्रेसमधून फुटून भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे विधानसभेतील माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अधिकृतरित्या भाजपात केव्हा प्रवेश करणार याविषयी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

SHARE

एका बाजूला मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना काँग्रेसमधून फुटून भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे विधानसभेतील माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अधिकृतरित्या भाजपात केव्हा प्रवेश करणार याविषयी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. या चर्चांना पूर्णविराम देत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विखे-पाटील १ जूनला भाजपात प्रवेश करतील, असे संकेत दिले आहेत. 

विखेंनी मंगळवारी सकाळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यावेळी विखे भाजपात केव्हा येणार? हा प्रश्न विचारला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर विखेंचा भाजपात प्रवेश होईल, असं उत्तर महाजन यांनी दिलं. पंतप्रधान मोदी ३० मे रोजी शपथ घेणार आहेत. 

वजन वाढलं

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभेचं तिकीट नाकारल्याने विखे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी सुजय यांना भाजपाकडून उमेदवारी मिळवून देत त्यांच्या विजयासाठी उघडपणे भाजपा कार्यकर्त्यांसोबत प्रचार केला होता. तरीही काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. याआधी काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचा दावा करणारे विखे-पाटील सुजय मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर उघडपणे भाजपा नेत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. भाजपामध्ये त्यांचं वजनही वाढल्याचं म्हटलं जात आहे. भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशीही चर्चा आहे. परंतु अजून त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झालेला नाही. 

फक्त औपचारिता बाकी

नुकतीच त्यांनी महाजन यांची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली. याबाबत बोलताना महाजन म्हणाले, ‘विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. सद्यस्थितीत कोणालाही काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये राहण्याची इच्छा नाही. विखे यांच्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील’, असा दावाही महाजन यांनी केला.

तर, या भेटीबाबत विखे-पाटील म्हणाले की, ‘महाजन यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. महाजन यांच्यासोबत माझे जुने मैत्रीचे संबंध आहेत. आता आम्ही एकत्र मिळून काम करणार आहोत.’ हेही वाचा-

राधाकृष्ण विखेंचं सुजयच्या पावलावर पाऊल; हाती घेणार ‘कमळ’

काँग्रेसचा विधीमंडळ नेता कोण? राहुल गांधी घेणार अंतिम निर्णय


 


संबंधित विषय
ताज्या बातम्या