Advertisement

काँग्रेसचा विधीमंडळ नेता कोण? राहुल गांधी घेणार अंतिम निर्णय

४ तास चर्चा करून देखील कुठल्याही एका नेत्याच्या नावावर एकमत न झाल्याने नेता निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.

काँग्रेसचा विधीमंडळ नेता कोण? राहुल गांधी घेणार अंतिम निर्णय
SHARES

काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याने काँग्रेसने विधानसभेतील नवा नेता निवडण्यासाठी मुंबईत बैठकीचं आयोजन केलं होतं. परंतु ४ तास चर्चा करून देखील कुठल्याही एका नेत्याच्या नावावर एकमत न झाल्याने नेता निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता विधिमंडळ नेत्याची घोषणा २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर दिल्लीतूनच होईल, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

बैठकीचं आयोजन

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चोहोबाजूने टीका झेलणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच होतं. त्यानुसार लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नवा विधिमंडळ नेता निवडण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आशीष दुवा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. तर विखे पाटील यांच्यासोबत १२ आमदारांनी बैठकीला दांडी मारली. 

‘यांची’ नावं चर्चेत

या बैठकीत विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री आणि विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड आणि नागपूरचे आमदार सुनील केदार यांची नावं चर्चेत होती. परंतु यापैकी कुठल्याही नावावर एकमत होऊ शकलं नाही. अखेर आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षासाठी नवा नेता निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा ठराव मांडला. या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिलं. 

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसला नेता निवडावा लागेल.



हेही वाचा-

Exit Poll Results: तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग

विधानसभा निवडणुकीत मनसेचं कमबॅक, ज्योतिष संमेलनातील भाकीत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा