Advertisement

फडणवीस गृहमंत्री असताना 'त्या' पार्टीची चौकशी का नाही?, सचिन सावंत यांचा सवाल

एका जुन्या व्हिडिओवरून करण जोहरला चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकतं, तर अभिनेत्री कंगना रणौतला का नाही? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीस गृहमंत्री असताना 'त्या' पार्टीची चौकशी का नाही?, सचिन सावंत यांचा सवाल
SHARES

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या एका व्हिडिओबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (ncb) त्याला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. एका जुन्या व्हिडिओवरून करण जोहरला चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकतं, तर अभिनेत्री कंगना रणौतला का नाही? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. 

एनसीबीने करण जोहरला चौकशी संदर्भात समन्स पाठवला आहे. करणच्या घरात २०१९ मध्ये झालेल्या एका पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या पार्टीत उपस्थित बाॅलिवूड (bollywood) कलाकारांनी अंमली पदार्थाचं सेवन केल्याचा आरोप केला जात होता. आता मात्र एनसीबीनं करण जोहरवर कोणत्याही प्रकरणात संशय नाही. केवळ ड्रग्जशी संबंधित काही माहिती मिळविण्यासाठी त्यांना बोलावण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- 'त्या' पार्टीची पुन्हा चौकशी; करण जोहर याला NCB कडून समन्स

त्यावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, हा व्हिडिओ २०१९ साली व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होतं. फडणवीस स्वत: गृहमंत्री होते. तेव्हा त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी, असं फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटलं नाही?

पार्टीच्या व्हिडिओवरून करणला चौकशीसाठी बोलणारी एनसीबी कंगना रणौतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते? ड्रग संदर्भात तिचाही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तिच्याबद्दल एनसीबीला एवढी आपुलकी का आणि कशासाठी? असे प्रश्न देखील सचिन सावंत (sachin sawant) यांनी उपस्थित केले आहेत. 

दरम्यान, करण जोहरच्या घरी आयोजित पार्टीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर २०१९ मध्ये व्हायरल झाला होता. करण जोहरनेच हा व्हिडिओ शूट केल्याचं म्हटलं जातं. या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा, रणबीर कपूर, विक्की कौशल, वरुण धवन, शकून बत्रा, जोया अख्तर, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, दीपिका पादुकोन आणि कार्तिक आर्यन हे कलाकार दिसत होते. 

करण जोहर आणि या व्हिडिओमधील कलाकारांवर एनसीबीकडून कारवाई केली जाईल, असं त्यावेळी म्हटलं जात होतं. एवढंच नाही, तर या व्हिडिओचा आधार घेत शिरोमणी अकाली दलाचे मंजिदंर सिंह सिरया यांनी NCB चे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याजवळ तक्रार करत या पार्टीची चौकशी करण्याची मागणी देखील केली होती. तरीही त्यावेळी या पार्टीची चौकशी करण्यात आली नव्हती.

(congress leader sachin sawant raises questions on devendra fadnavis and bjp government over ncb inquiry of karan johar)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा