Advertisement

राजकीय नेत्यांसह 'क्रिकेटचा देव'ही धावला पूरग्रस्तांच्या मदतीला

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) ‘पंतप्रधान मदत निधी’तून पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य केलं आहे.

राजकीय नेत्यांसह 'क्रिकेटचा देव'ही धावला पूरग्रस्तांच्या मदतीला
SHARES

कोल्हापूर-सांगलीतील महापुराचं पाणी (Kolhapur Sangli Flood) ओसरत असलं, तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर कायम आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीत मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्याशिवाय, मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला असून, ‘क्रिकेटचा देव’ही त्यांच्या मदतीसाठी सरसावला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) ‘पंतप्रधान मदत निधी’तून पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य केलं आहे.

खारीचा वाटा

'प्रार्थनेसाठी जोडलेल्या २ हातांपेक्षा मदतीसाठी पुढे सरसावलेला एक हात हा जास्त महत्वाचा असतो! महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत! पूर पीडितांना कष्ट, त्रास, अपेष्टा यापासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित', अशा भावना उर्मिलानं ट्विटरवरुन व्यक्त केल्या.

पूरग्रस्त भागाचा दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. शर्मिला ठाकरे पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देणार आहेत. तसंच, सांगलीतल्या पूरबाधित लोकांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर, मिरज शहरातल्या कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांची भेट घेऊन जनावरांच्या छावणीची पाहणी करणार आहेत. त्याशिवाय, कोल्हापुरातल्या पुराच्या विळख्यात सापडलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतल्या पूरबाधित लोकांची भेट घेणार असून, कोल्हापुरातल्या पुराची पाहणी करून झाल्यानंतर त्या साताऱ्यातील पूरग्रस्त लोकांना भेट देऊन त्यांना मदत करणार आहेत.

'क्रिकेटचा देव'ही धावला

'देशभरात आलेल्या महापुराने विनाश ओढावला आहे. पाणीपातळी कमी होत असताना पूरग्रस्त राज्यांना मदतीची आवश्यकता आहे. मी ‘पंतप्रधान मदत निधीच्या माध्यमातून मदत केली आहे. तुम्हा सर्वांना मदत आणि सहकार्य करण्याचं आवाहन करतो’ असं ट्वीट सचिन तेंडुलकरनं केलं आहे.


वाईट परिस्थिती निर्माण

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेनेही पूरग्रस्तांना मदत केली आहे. 'आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळं प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली इथं विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा', असं आवाहन रहाणेनं केलं होतं.

कलाकारांनीही केली मदत

दरम्यान, राज्य सरकारसह अनेक संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक जण मदत करत आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी, अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यासारख्या मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. तसंच, अक्षय कुमार, रितेश देशमुख, अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूड कलाकार वगळता अपवादानेच मनोरंजन विश्वातून मदतीचा ओघ आलेला आहे.हेही वाचा -

राखीनंतर आता सीड तिरंग्याची क्रेझ, साजरा करा पर्यावरणपूरक स्वातंत्रदिन

नारळी पोर्णिमेसाठी मुंबईतील सर्व कोळीवाडे सज्जसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा