Advertisement

भाजप, फडणवीसांना रेमडेसिवीरचा साठा, काळाबाजार करण्याची परवानगी दिलीय का?- काँग्रेस

वास्तविक रेमडेसिवीरचा साठा किंवा वितरण खासगी व्यक्तीला करता येत नाही. तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली?

भाजप, फडणवीसांना रेमडेसिवीरचा साठा, काळाबाजार करण्याची परवानगी दिलीय का?- काँग्रेस
SHARES

केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून पोलिसांवर दबाव टाकणारे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी (mumbai police) शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत कंपनी मालकाची बाजू घेतली होती. त्यावर नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ही उपस्थित केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात की, राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोकं औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार करत आहेत. मुंबई पोलिसांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तातडीने ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन वांद्रे-कुर्ला येथील डीसीपी कार्यालयात चौकशीसाठी आणलं असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्यांना सोडवलं आणि तो साठा आमच्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगी मिळवल्याचा दावा केला.

हेही वाचा- दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही लाॅकडाऊन?, मुख्यमंत्री २ दिवसांत घेणार निर्णय

वास्तविक रेमडेसिवीरचा साठा किंवा वितरण खासगी व्यक्तीला करता येत नाही. तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली? केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना (devendra fadnavis) रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वांदे-कुर्ला डीसीपी कार्यालयात जो प्रकार घडला तो राज्यासाठी लाजीरवाणा आहे.

५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रेमडेसिवीरच्या साठेबाजीची चौकशी सुरू केली. ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ते रेमडेसिवीर जनतेला उपलब्ध करून दिलं पाहिजे.

आज राज्यात रेमडेसिवीर आणि आॅक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून केंद्र सरकार राज्यासोबत आणि राज्यातील जनतेसोबत जे घोणेरडं राजकारण करत आहे, ते निषेधार्ह आहे. रेमडेसिवीरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कोटींच्या रेमडेसिवीरचा साठा कुठून आला? याचा काळाबाजार करणारे ते लोक कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळालीच पाहिजे. आणि फडणवीसांनी दाखवलेलं ते पत्र सार्वजनिक केलं पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

(congress maharashtra president nana patole demands strict action against devendra fadnavis in remdesivir injection stocking case)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा