महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे रवी राजा

 BMC
महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे रवी राजा
BMC, Mumbai  -  

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांची निवड करण्यात आली आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे मागील महिन्यापासून विरोधी पक्षनेते पदाचा जो तिढा होता, तो सुटला.

महापालिका सभागृहात दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपाने ना सत्ताधाऱ्यांसह युती केली ना विरोधी पक्षात बसण्याची भूमिका जाहीर केली. भाजपाने तटस्थ राहत पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्ष हा आवश्यक असल्यामुळे काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड करून हे पद भाजपाला दिले जावे अशी मागणी हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. यावर विधी खात्याच्यावतीने अभिप्राय मागवण्यात आले होते. हे अभिप्राय महापौरांनी सभागृहात वाचून दाखवले.

विधी खात्याच्यावतीने दिलेल्या या अभिप्रायमध्ये संसदीय तरतुदीनुसार सभागृहात निर्णय घेण्याचे अधिकार हे महापौरांना आहेत. त्यामुळे ज्या पक्षांचे नगरसेवक अधिक आहे, अशा दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला विरोधी पक्षनेते दिले जावू शकते. परंतु त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यास तृतीय क्रमांकावरील पक्षाला निमंत्रित करता येवू शकते,असे म्हटले होते.

विधी तज्ज्ञांनी दिलेल्या अभिप्रायनुसार, भाजपाने विरोधी पक्ष नेता पद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे रवी राजा यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आपली विरोधी पक्ष नेतेपदी निवड करावी, असे पत्र दिले. त्या पत्रानुसार महापौरांनी मंगळवारी विरोधी पक्ष नेता म्हणून घोषणा केली.

रवी राजा हे 2002-2007, 2007-2012 आणि मार्च 2017 तिसऱ्यांदा नगरसेवक बनले आहेत. 2002 पासून सलग बेस्ट समितीवर ते सदस्य म्हणून आहेत. आपले काम विरोधी पक्षाचे आहे आणि जी भ्रष्टाचाराची आणि घोटाळ्याची प्रकरण पुढे आली आहेत, त्यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम करणार, असल्याची माहिती रवी राजा यांनी दिली. जकातीत 10 टक्के महसूल मिळत नाही आणि ते अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत. काँग्रेसच्या भांडूपमधील नगरसेविका प्रमिला पाटील यांनी जकात चोरी करणारे 7 ट्रक पकडले. मग पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांचे काम काँग्रेस करत आहेत, मग भाजपावाले काय करत आहेत,असा सवाल राजा यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचा इशारा
भाजपाने यावेळी आपण विरोधी पक्षनेतेपद स्वीकारत नसल्याचे जाहीर करत आपल्याला घटनेप्रमाणे ज्यांना बहाल करायचे त्यांना करावे. परंतु विरोधी पक्ष म्हणून त्यांनी चोख कामगिरी न केल्यास त्यांना खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही,असा इशारा भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिला.

आतापर्यंत झालेले विरोधी पक्ष नेता

2000-2003 -  खान बस्तीवाला
2003-2004 - गुणवंत शेठ
2004-2012 - राजहंस सिंह
2012-2013 - न्यानराज निकम
2013-2016 - बाळा आंबेरकर
2016-2017 - प्रवीण छेडा

Loading Comments