कोरोनाबाधित (covid-19) रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचं प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे २९५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
५ टक्क्यांहून कमी गंभीर
राज्यात कोरोना (corona test) चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत ४८ हजार १९८ जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर २९१६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के जणांना लक्षणे दिसत नसून २५ टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर ५ टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट
परिश्रमाचं फळ
९ मार्चला राज्यातील पहिले २ कोरोना रुग्ण (corona positive) आढळून आले. पुण्यातील दाम्पत्य असलेले हे रुग्ण १४ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर २३ मार्चला बरे होऊन घरी गेले. राज्यातील पहिले कोरोनामुक्त रुग्ण म्हणूनही त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी सांगितलं.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 2916 Today newly 232 patients have been identified as positive for Covid19. From these, 295 Covid19 patients have been cured and discharged from the respective hospitals.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 15, 2020
इथल्या रुग्णांचा समावेश
बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील १६६, ठाणे मनपा ६, ठाणे ग्रामीण ३, कल्याण डोंबिवली १४, मीरा भाईंदर २, नवी मुंबई ९, पनवेल ३, उल्हासनगर १, वसई विरार २, नागपूर ११, पुणे महापालिका परिसर २७, पिंपरी चिंचवड १२, पुणे ग्रामीण ४, अहमदनगर ग्रामीण १, अहमदनगर महापालिका क्षेत्र २, नाशिक ग्रामीण १, रत्नागिरी १, सिंधुदुर्ग १, सांगली २५, सातारा १, यवतमाळ ३ आणि गोंदिया १ अशा एकूण २९५ रुग्णांचा समावेश असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
हेही वाचा - वरळीतील १२९ जण क्वारंटाईनमधून मुक्त
मुख्यमंत्र्यांचा संवाद
मंगळवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगतानाच कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये ६ महिन्याच्या चिमुकल्यापासून ते ८३ वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणाऱ्या ६ महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचं अभिनंदनही केलं होतं.