महाराष्ट्र कोरोना साथीच्या (Coronavirus) अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे पुढचे १५ ते २० दिवस आपल्या सर्वांसाठीच परीक्षेचे आणि कसोटीचे आहेत. यादरम्यान डगमगून जाऊ नका, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी केल्या. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - संकट गंभीर; पण सरकार खंबीर - मुख्यमंत्री
ते पुढं म्हणाले, राज्यात संचारबंदी (curfew) लागू झाल्यावर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. लोकं जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करत होते. पण सरकारने धाडसी निर्णय घेऊन जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अन्नधान्य, भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यामुळे कृपया गर्दी करून पोलिसांवरील ताण वाढवू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
मुंबई, पुण्यातून आपल्या मूळगावी जाण्यासाठी काही लोकं ट्रक, टॅम्पोतून प्रवास करत आहेत. हे बघून मला धक्काच बसला. आहे तिथंच राहा. धोका पत्कारून गावी जाण्याचा प्रयत्न करू नका. रस्त्यावर गर्दी करू नका. संकट आलंय म्हणून चिंता करत बसू नका. घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवा. संकट घराबाहेर आहे, घरात नाही. त्यामुळे घरातलं वातावरण आनंदी राहू द्या, असंही ठाकरे म्हणाले.
डाॅक्टरांनी घाबरून न जाता आपले दवाखाने बंद ठेवू नका. आलेल्या रुग्णांवर उपचार करा. कोरोना संशयितांना सरकारी रुग्णालयात पाठवा, अशी कळकळीची विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी केली.
हेही वाचा - Coronavirus Updates: अनावश्यक गर्दी टाळा, ट्रेन, बस बंद करण्याची वेळ आणू नका- मुख्यमंत्री