Advertisement

३ मे नंतर लाॅकडाऊन वाढणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्रीन,ऑरेंज आणि रेड झोनबाबतही (red zone) महत्त्वपूर्ण भाष्य केलं. ते म्हणाले की, कामं सगळ्यांचीच अडली आहेत. याची मला कल्पना आहे. त्यामुळे हळुहळू सर्व कामं सुरू करण्यात येतील.

३  मे नंतर लाॅकडाऊन वाढणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, म्हणाले...
SHARES

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या लाॅकडाऊनचा (lock down in maharashtra) दुसरा टप्पा ३ मे रोजी संपत आहे. यानंतर महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरूच राहणार की संपणार याविषयीची कमालिची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत लाॅकडाऊन वाढणार की नाही, याबद्दलचे स्पष्ट संकेत जनतेला दिले. महाराष्ट्र दिनाच्या (maharashtra day) निमित्ताने १ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. 

किती वेळ घरी बसायचं ?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) म्हणाले, ३ मे नंतर आम्ही काय करायचं ? किती वेळ घरी बसायचं ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. काही प्रमाणात हे खरंही आहे. पण अर्थासोबत संपत्ती म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खरी संपत्ती ही त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. नागरिक वाचले पाहिजेत. ते वाचले तर हा गाडा चिखलातून काढून आपण पुढे नेऊ शकतो.

हेही वाचा - ‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी

झोननुसार मोकळीक

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्रीन,ऑरेंज आणि रेड झोनबाबतही (red zone) महत्त्वपूर्ण भाष्य केलं. ते म्हणाले की, कामं सगळ्यांचीच अडली आहेत. याची मला कल्पना आहे. त्यामुळे हळुहळू सर्व कामं सुरू करण्यात येतील, पण त्यात कुठलीही गडबड होता कामा नये, नाहीतर आतापर्यंतची आपली सर्व तपश्चर्या वाया जाईल. ३ मे नंतर राज्यातील काही भागात झोननुसार मोकळीक देण्यात येईल. यापैकी ग्रीन झोनमध्ये अटी काहीशा शिथील केल्या जातील. मात्र रेड झोनमध्ये अद्याप धोका कायम असल्याने या भागात बंधने कायम ठेवण्यात येतील.  

हळुहळू शिथीलता

मुंबई, कल्याण-डोंबिवली परिसर, पुणे परिसर, नागपूर, औरंगाबाद इत्यादी शहरं रेड झोनमध्ये येत आहेत. जिथं रोज कोरोनाबाधितांचे आकडे थोडे थोडे वाढतच आहेत. तिथं सध्या तरी काहीही करणं आपल्या हिताचं नाही. आॅरेंज झोनमध्ये कोरोनाबाधितांच्या अॅक्टिव्ह केस आहेत, तो परिसर सोडला, तर उर्वरीत भागासाठी आपण नक्कीच विचार करत आहोत आणि ग्रीन झोनमध्ये आपण आधीच सवलतीसंदर्भातील घोषणा केली आहे. त्यानुसार लाॅकडाऊनमध्ये हळुहळू शिथीलता आणली जाईल.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवणं भाजपसाठी फायद्याचं की धोक्याचं?

लाॅकडाऊनचा फायदा काय?

राज्यात रुग्ण तर वाढतच आहेत. मग लाॅकडाऊनचा नेमका फायदा काय झाला? असे काहीजण विचारत आहेत. पण हे लक्षात घ्या की या लाॅकडाऊनने कोरोना संसर्गात गतीरोधकाचं काम केलं आहे. सर्कीट ब्रेकर म्हणजेच श्रृंखला तोडण्याचं काम केलंय. तसं नसतं तर महाराष्ट्रात आजघडीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या भयंकर असती, ती गुणाकार पद्धतीने वाढली असती. सध्या ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आहेत, ते सुरूवातीच्या काळात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपासून वाढलेले आहेत. त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करून आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा