नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा जनतेला इशारा

बेजबाबदारपणे वागून नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी दिला आहे.

नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा जनतेला इशारा
SHARES

कोरोना व्हायरस (coronavirus) विरोधातील लढा जिंकायचा असेल, तर घरातच थांबून प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. परंतु प्रशासन सातत्याने विनंती करूनही समाजातील ५ ते १० टक्के लोकं रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे काेरोनाविरोधात लढा देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे बेजबाबदारपणे वागून नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी दिला आहे.

बेजबाबदारपणा सुरूच

आपल्या ट्विटर हँडलवरून जनतेशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरसने (covid-19) हाहाकार माजवला आहे. तेथील जनता गाफील राहिल्याने त्यांच्यावर हे मोठं संकट कोसळलं आहे. त्या देशात कोरोना व्हायरसमुळे गेलेल्या बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. आपल्याकडे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढा देत आहेत. या सर्वांच्या त्यागाचा जनतेने सन्मान केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा- सव्वा दोन लाख परप्रांतीय-मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केलीय- मुख्यमंत्री

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणाऱ्या गर्दीमुळे ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात येत आहे. जनतेने घरातच थांबलं पाहिजे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

संयम हिच तटबंदी

याआधी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीही जनतेला घरातच राहण्याचा सल्ला दिला होता. या लढाईमध्ये आपला संयम आणि आपली जिद्द हीच आपली तटबंदी आहे. या तटबंदीवर त्या विषाणूने कितीही टकरा मारल्या तरी आपण लेचेपेचे नाही आहोत. आपल्या आत्मविश्वासाची, संयमाची, जिद्दीची तटबंदी ही मजबूत आहे. याच जोरावर आपण ही लढाई जिंकू, असा धीर मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला.

संबंधित विषय