Advertisement

Coronavirus Updates: महाराष्ट्र लाॅकडाऊन! ५ हून अधिकजण रस्त्यावर फिरु नका

राज्यात अवघ्या काही तासांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १० ने वाढून ७४ वर जाऊन पोहोचल्याने अखेर संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदीचं कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी रविवारी मध्यरात्री सुरू होऊन ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे.

Coronavirus Updates: महाराष्ट्र लाॅकडाऊन! ५ हून अधिकजण रस्त्यावर फिरु नका
SHARES

राज्यात अवघ्या काही तासांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १० ने वाढून ७४ वर जाऊन पोहोचल्याने अखेर संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदीचं कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी रविवारी मध्यरात्री सुरू होऊन ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. यामुळे ५ हून अधिक व्यक्तींचा जमावर रस्त्यांवर दिसून आल्यास किंवा घोळक्याने उभंं राहिल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

काही वेळापूर्वीच राज्य सरकारने मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ राज्यातील दळणवळणाचं महत्त्वाचं साधन असलेली एसटी बस सेवाही सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत मेट्रो आणि मोनोनेही आपली सेवा आधीच बंद केली होती. शिवाय रेल्वे मंत्रालयानेही आदेश काढत ३ हजार  ७०० हून अधिक एक्स्प्रेस गाड्या बंद ठेवल्या होत्या. 

५ पेक्षा अधिक जणांनी जमू नये

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी सोशल मीडियावरून महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपण सध्या अत्यंत संवेदनशील काळातून जात आहोत. कोरोना व्हायरसचा अत्यंत वेगाने प्रसार होत असल्याने नाईलाजाने रविवारच्या मध्यरात्रीपासून राज्यात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही गरजेशिवाय बाहेर पडू नका. ५ हून अधिक माणसांनी जमून गर्दी करू नका. लोकलसेवा आधीच बंद करण्यात आली आहे. बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू राहिल. आजच्या मध्यरात्रीपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. त्यामुळे परदेशातून एकाही व्यक्ती आता भारतात येणार नाही. 


गुणाकार पद्धतीने वाढतोय कोरोन

जे लोकं परदेशातून भारतात आलेत आणि ज्यांना सरकारी रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशा व्यक्तींची काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्या व्यक्तींना घरातच क्वारंटाईन रहा, असं सांगण्यात आलं आहे, त्यांनी कृपा करून पुढचे १५ दिवस घराबाहेर पडू नका. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही समाजात मिसळू नका. तसंच इतरांनाही घराबाहेर पडू देऊ नका. कारण जगभरात हाहाकार माजवत असलेला कोरोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढत असल्याने अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. ही काळजी आपली आपल्यालाच घ्यायची आहे.


अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील

या काळात वीज, पाणी, अन्नधान्य, भाजीपाला इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील. ती दुकाने उघडी राहतील. त्यामुळे कुणीही उगीच अन्नधान्याचा साठा करून ठेवू नका. ज्याचं हातावर पोट आहे, अशा कामगारांना किमान वेतन देण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु हे संकट खूप मोठं असून सद्यस्थितीत जीवापेक्षा मोठं काहीही नाही. मंदिर, मशिदी आदी सगळी धार्मिक स्थळं बंद ठेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सरकारी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी ५ टक्के कर्मचारी कार्यरत राहतील. परंतु  त्यामुळे गरज पडलीच, तर हे लॉकडाऊन ३१ मार्च नंतर वाढवला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा