Advertisement

तर, महाराष्ट्रात ३० एप्रिलनंतरही लाॅकडाऊन सुरू राहील- राजेश टोपे

राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी किमान या शब्दावर जोर दिला आहे. त्यामुळे लोकांनी यापुढेही नियम आणि शिस्त पाळली नाही तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवावं लागू शकतं, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

तर, महाराष्ट्रात ३० एप्रिलनंतरही लाॅकडाऊन सुरू राहील- राजेश टोपे
SHARES

राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी किमान या शब्दावर जोर दिला आहे. त्यामुळे लोकांनी यापुढेही नियम आणि शिस्त पाळली नाही तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवावं लागू शकतं, अशा स्पष्ट शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला इशारा दिला. 

जनतेच्या हातात

प्रसारमाध्यमांना राज्यातील सद्यस्थितीविषयक माहिती देताना राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात शिस्त पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लाॅकडाऊन ३० एप्रिलतर्यंत वाढवण्याची घोषणा करताना त्यांनी किमान या शब्दावर जोर दिला आहे.जनतेने जर शिस्त पाळली नाही, तर ३० एप्रिलपर्यंत हे लाॅकडाऊन वाढवावं लागू शकतं. सरकारला सोशल डिस्टन्सिगसाठी आणखी कठोर उपाययोजना कराव्या लागू शकतील. त्यामुळे लाॅकडाऊन वाढवावं की नाही हे सगळं जनतेच्याच हातात आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

३ झोन बनवणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या प्रमाणानुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार केले जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. १५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत तिथं रेड झोन, १५ पेक्षा कमी रुग्ण असणारे जिल्हे ऑरेज झोनमध्ये असतील, तर एकही रुग्ण नाही याठिकाणी ग्रीन झोन लावण्यात येणार आहे.  ग्रीन झोनमध्ये जिल्ह्याच्या सीमाबंद करुन म्हणजेच लाॅक इन पद्धतीने अंतर्गत कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल. केंद्राचे दिशानिर्देश आल्यानंतर हे झोन तयार केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सर्वाधिक चाचण्या

महाराष्ट्रात आतापर्यंत देशातील सर्वाधिक ३३ हजार कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यातील १ हजार जण रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे नसून २५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर ५ टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

हेही वाचा- Corona Updates: एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे इथले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण असून ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात १० टक्के तर पुणे येथे २० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ५.५ टक्के आहे. त्यामुळे रुग्ण समोरुन येण्याची वाट न बघता महापालिका आता घरोघरी जाऊन चाचण्या करत आहे. केंद्र सरकारला सांगून आपण आणखी ५ चाचणी केंद्र येत्या २ ते ३ दिवसांत सुरू करत आहोत. यामुळे राज्यातील कोविड-१९ चाचणी केंद्रांची संख्या ३० वर जाईल, असंही ते म्हणाले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा