Advertisement

पुढची लढाई बिकट, कोरोनाच्या केस वाढणार, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची सूचना

कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे काय शिकायचं? पुढचे काही दिवस, काही महिने आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल, आपले हात धुत राहावे लागतील, सतत तोंडाला हात न लावणं, एकमेकांपासून अंतरावर राहणं, रस्त्यावर थुंकू नये. कोरोनानंतरचं जग असे असेल.

पुढची लढाई बिकट, कोरोनाच्या केस वाढणार, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची सूचना
SHARES
Advertisement

पुढील लढाई अधिक बिकट होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार आहेत. पण घाबरण्याचं कारण नाही. आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करत आहोत. राज्यात काही लाखांमध्ये आपण रुग्णशय्याची व्यवस्था करत आहोत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी रविवार २४ मे २०२० रोजी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

साडेतीन लाख टेस्ट

महाराष्ट्रातील कोरोनासंदर्भातील (coronavirus) माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जवळपास साडे तीन लाखाच्या आसपास कोरोना टेस्ट (corona test) झाल्या आहेत. त्यामध्ये जवळपास ३ लाख टेस्ट निगेटिव्ह आल्या. दुर्दैवाने यामध्ये १५७७ मृत्यू झाले आहेत. ४७१९० रुग्णांपैकी १३,४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सव्वा लाख रुग्णांची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु आज अॅक्टिव केसेस हे ३३,७८६ आहेत. तुम्ही जी शिस्त पाळली, हिंमत दाखवली त्यामुळे हे शक्य झालं.

१४ हजार बेड

मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ८४ वर्षांच्या आजी बऱ्या होऊन घरी गेल्या. आता त्याही पुढे आपण गेलो आहोत, एक ९० वर्षांच्या आजी मुंबईमध्ये बऱ्या होऊन स्वतःच्या पायाने घरी गेल्या आहेत. नवजात अर्भकांपासून ते ९० वर्षांच्या आजींपर्यंत सर्व कोरोनाचा यशस्वी मुकाबला करत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी आपल्याकडील हाॅस्पिटल्समध्ये हजाराच्या आसपास बेड होते. आज आपण हे हॉस्पिटल्स आणि फील्ड हॉस्पिटल्स यांची एकत्रित संख्या मोजल्यास मे अखेरीस आपण किमान १४,००० बेड आपण उपलब्ध करून देऊ शकतो. राज्यात अनेक मैदानं, सभागृह आम्ही सज्ज ठेवली आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, गोरेगाव इथं फिल्ड हॉस्पिटल सुरू केली आहेत.  

हेही वाचा - परप्रांतीय परत जाताहेत, येत्या १५ दिवसांत देशाचं खरं चित्र समोर येईल- उद्धव ठाकरे

डाॅक्टारांचे प्रयत्न

कोरोना विषाणूवर औषध नाही, हे सत्य असलं तरी आपले डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत त्या सगळ्या डॉक्टर्सना, आपल्या युद्धातल्या सैनिकांना जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहेत. हाय रिस्क ग्रुप, ५५ वर्षांच्या वर, ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, इतर आजार असतील त्यांच्यावर कोरोना विषाणू जास्त घातक दुष्परिणाम करतो आणि त्यासाठी आपण पावसाळी साथींपासून दूर राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

मी काल परदेशात असलेल्या एका मराठी डॉक्टरशी बोललो. त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना विचारले की तुमच्या देशात काय चाललेले आहे, त्यांनी त्यांच्या देशातली परिस्थिती सांगितली आणि मला असं सांगितले की, "उद्धव जी, आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने लढतोय, ही फार अभिमानाची गोष्ट आहे." मला एका गोष्टीचा अभिमान आहे, माझा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, शहरं आहेत हे सगळे खूप जिद्दीने या लढ्यात उतरले आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं.

रक्तदान करा

आपल्याकडे पुढचे ८-१० दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. मी तमाम रक्तदात्यांना नम्र आवाहन करत आहे की महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे व महाराष्ट्राचं रक्त काय असतं,महाराष्ट्राच्या रक्तामध्ये संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे हे पुन्हा दाखवायचे आहे म्हणून पुन्हा रक्तदान करण्याची आवश्यकता आहे, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे काय शिकायचं? पुढचे काही दिवस, काही महिने आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल, आपले हात धुत राहावे लागतील, सतत तोंडाला हात न लावणं, एकमेकांपासून अंतरावर राहणं, रस्त्यावर थुंकू नये. कोरोनानंतरचं जग असे असेल.

संबंधित विषय
Advertisement