Advertisement

‘कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंसारख्या सेनापतीची गरज’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra cm uddhav thackeray) हे लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. कोरोनाशी जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे.

‘कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंसारख्या सेनापतीची गरज’
SHARES

पंतप्रधानांना जे सांगायचं आहे, त्याचा विपरीत अर्थ काढून लोकं आपापली सोय पाहत आहेत. दुसरं असं की, पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. याउलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra cm uddhav thackeray) हे लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. कोरोनाशी जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून (saamana editorial) पंतप्रधानांच्या दिपप्रज्वलनाच्या आवाहनावर टीका करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाइट बंद करून दिपप्रज्वलन करण्याचं आवाहन देशातील नागरिकांना केलं होतं. यातून कोरोनाशी लढताना एकजुटीचा संदेश मिळेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली होती. परंतु पंतप्रधानांचा आदेश पाळताना काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिगचा नियम मोडल्याचं निदर्शनास आलं. यावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. 

हेही वाचा- तबलिगींना गोळ्या घाला? राज ठाकरेंनी विधान त्वरीत मागे घ्यावं- रामदास आठवले

लोकांपर्यंतभावना पोहोचत नाही

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतरही अखेर जे व्हायचे तेच झाले. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी जी उपाययोजना सांगितली त्यात सर्वप्रथम त्यांनी घराच्या गॅलरीत येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितल्या व रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या लावाव्यात असे आवाहन केले. पण लोकांनी रविवारी काय केले ते पाहण्यासारखे आहे. काहीतरी गडबड निश्चित आहे.

पंतप्रधानांच्या भावना लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत असे दिसते. अन्यथा रविवारी देशात अनेक ठिकाणी जे दिव्य प्रताप झाले ते घडले नसते. लोकांनी काळोख केला हे खरे, पण त्या काळोखात लोक पुन्हा `झुंड’ करून रस्त्यांवर उतरले. हातात मेणबत्या, टॉर्च, मोबाईलच्या बॅटऱ्या नाचवत थयथया नाचू लागले. त्यामुळे कोरोनाशी लढताना ज्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ची सगळय़ात जास्त गरज आहे त्याची ऐशीची तैशी झाली. पंतप्रधानांनाही हा तमाशा नक्कीच अपेक्षित नसावा.    

आतिषबाजी करणं हास्यास्पद

कोरोनामुळे आज हजारो रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. काहींनी त्यांचे प्राणही गमावले आहेत. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यांवर घोळक्याने फिरतात, घोषणा देतात, फटाके फोडतात, आतिषबाजी करतात हा सगळाच प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल. `मरकज’वालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचला कोरोना, मातोश्री परिसर सील

मदतीवर भर

लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. ठाकरे हे लोकांना मदत कशी करता येईल यावर भर देत आहेत. वैद्यकीय सुविधा कशा वाढवता येतील यावर लक्ष ठेवून आहेत. लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. कोरोनाशी जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे.

अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा