Advertisement

तबलिगींना गोळ्या घाला? राज ठाकरेंनी विधान त्वरीत मागे घ्यावं- रामदास आठवले

राज ठाकरेंनी आपलं हे वक्तव्य त्वरीत मागे घ्यावं, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

तबलिगींना गोळ्या घाला? राज ठाकरेंनी विधान त्वरीत मागे घ्यावं- रामदास आठवले
SHARES

कोरोनाचं संकट (coronavirus) वाढत असताना दिल्लीतील निजामुद्दीन (nizamuddin delhi) येथील प्रसिद्ध मशिदीत जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करून हजारो जणांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेजबाबदार तबलिगी समााजातील लोकांना गोळ्या घाला, असं वक्तव्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करतो. राज ठाकरेंनी आपलं हे वक्तव्य त्वरीत मागे घ्यावं, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. 

काय म्हणाले आठवले?

आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओतून संवाद साधताना रामदास आठवले (rpi chief ramdas athawale) यांनी हे मत व्यक्त केलं आहे. आठवले यासंदर्भात म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लाॅकडाऊन (lockdown) असताना देखील तबलिगी जमातने (tablighi jamaat) कार्यक्रमाचं आयोजन करून गर्दी गोळा केली. त्यांच्यामुळे देशात ठिकठिकाणी कोरोना पसरला हे देखील खरं आहे. अत्यंत नींदनीय असं हे कृत्य आहे. हजारो लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कार्यक्रमाच्या आयोजकांना नक्कीच कायदेशीरपणे शिक्षा झालीच पाहिजे. पण केवळ तबलिगींमुळेच देशात कोरोना पसरला असं म्हणणं योग्य नाही. कारण हा कार्यक्रम आयोजित करण्याआधी देशात सर्वत्र कोरोना पसरलेलाच होता.

हेही वाचा - मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, राज ठाकरे संतापले

अशोभनीय वक्तव्य

त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तबलिगींना थेट गोळ्या घातल्या पाहिजे, असं वक्तव्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. इथं आपल्याच देशातील लोकांना गोळ्या मारण्याची भाषा करणं योग्य नाही. उद्या तबलिगी जमातचे लोकं पण उत्तर म्हणून गोळ्या घालण्याची भाषा करतील. तसं झाल्यास देशात कोरोनापेक्षाही मोठा हाहाःकार माजेल. गोळ्याच्या मारायच्या असतील त सीमेवर जाऊन दुश्मनांना मारल्या पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे यांचं वक्तव्य असंवैधानिक आहे. ते स्वत: एका मोठ्या पक्षाचे नेते आहे, त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं. त्यामुळे त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे. त्यांचे बंधु आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याची दखल घ्यायला हवी, अशी मागणीही आठवले यांनी केली. 

काय म्हणाले होते राज?

दिल्लीमधील निझामुद्दीन इथं झालेल्या तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर संताप व्यक्त करताना मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली होती.

 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा